काही महिन्यांपासून तालुक्यात पशूधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटय़ांचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली असतानाच शहरालगतच्या वडगाव शिवारात चोरटय़ांनी रखवालदाराची हत्या करून दोन बैलांची चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पशूधन चोरटय़ांची मजल हत्येपर्यंत गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांचा त्वरीत शोध घेण्याची मागणी केली जात आहे. जवळच असलेल्या साक्री तालुक्यातही काही दिवसांपूर्वी बैल चोरून घेऊन जाणारा ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता. पावसाने उशीरा का होईना बऱ्यापैकी साथ दिल्याने पाणी आणि चाऱ्याची समस्या दूर झाली आहे. या पाश्र्वभूमीवर बैलांची चोरी होऊ लागल्याने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे.
मालेगाव तालुक्यात चोरटय़ांच्या हल्ल्यात ठार झालेला कोळजी नामदेव चव्हाण (७०) हा रखवालदार मालेगाव र्मचट बँकेचे संस्थापक हरिलाल अस्मर यांच्या शेतात कामास होता. जवळच असलेल्या वैतागवाडी येथे त्याचे कुटूंब वास्तव्यास असून चोरीच्या धास्तीने पशूधनाच्या रखवालीसाठी रोज रात्री तो शेतात जात असे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याचा मुलगा अशोक हा दूध घेण्यासाठी शेतात गेला असता त्याला पित्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. दोन बैल गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे बैल चोरटय़ांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कोळजीची हत्या झाल्याचा अंदाज आहे. त्याच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला फावडा आढळून आला. या हत्येची माहिती समजल्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकच गलका केला. आ. दादा भुसे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी पशूधन चोरीच्या घटना वाढत असतांना एकाही घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बैल चोरटय़ांमुळे शेजारील साक्री तालुक्यातील शेतकरीही हादरले आहेत. दहा दिवसांपूर्वी साक्री तालुक्यात बैल चोरटय़ांचा शेतकऱ्यांनी स्वत: पाठलाग करून चोरटय़ांना गाठले होते. ज्या ट्रकमधून बैल नेण्यात येत होते. ती ट्रकच पेटवून देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता. संशयितांना आपल्या ताब्यात देण्याची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली होती. त्यावरून पोलीस आणि शेतकरी यांच्यात वादही निर्माण झाला होता. ही घटना ताजी असतानाच मालेगावजवळ बैल चोरटय़ांनी रखवालदाराची हत्या करून बैलांची चोरी केल्याचे उघड झाल्याने बैलचोरीच्या घटना रोखण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. सध्या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याची समस्या मिटल्याने काही प्रमाणात शेतकरी सुखावला असताना बैल चोरीच्या घटनांमुळे त्यांचे रक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळी जागता पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.