कापूस संशोधनात उझबेकीस्तानच्या प्रगतीचा फायदा देशातील कोरडवाहू व कमी कालावधीच्या पिकासाठी करुन घेण्याचा मानस डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रविप्रकाश दाणी यांनी व्यक्त केला. नुकताच त्यांनी सहा दिवसांचा उझबेकीस्तान येथील विविध शिक्षण संस्था व विद्यापीठांचा दौरा केला. या दौऱ्याची फलश्रुती त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
देशी कापसाच्या जातीचे उत्पादन वाढविणे, कमी कालावधीत कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणाऱ्या कापसाच्या जातींचा शोध घेणे, त्याचा प्रचार व प्रसार करणे, उझबेकिस्तान व भारत यांच्यात कापूस संशोधनासाठी सामंजस्य करार करणे, हे उद्देश डोळ्यासमोर ठेवत उझबेकिस्तानचा दौरा करण्यात आला. या दौऱ्यास राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती के.शंकरनारायण यांनी परवानगी देत कापूस संशोधनासाठी भक्कम पाठिंबा दिल्याचे मत कुलगुरू डॉ.दाणी यांनी व्यक्त केले. कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणे, पीक तंत्रज्ञानाचे आदानप्रदान करणे, कापसाच्या वेचणी यंत्राबाबत माहिती घेणे व ते विकसित करण्यासाठी पुढाकार घेणे, तसेच या दौऱ्यांच्या माध्यमातून देशी कापसाच्या डीएनए कोडिंगसाठी मोलाचे सहकार्य उझबेकिस्तान करणार आहे. या माध्यमातून देशी कापसाच्या बियाण्यांवरील व कापसावरील आपले स्वामित्व अबाधित राखण्यास मोलाची मदत होणार असल्याची माहिती डॉ.रविप्रकाश दाणी यांनी येथे दिली.
उझबेकिस्तान अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स, ताश्कंद येथे डॉ.दाणी यांनी संशोधन कार्य केले होते. या कार्यामुळे त्यांना डॉक्टरेट ऑफ बॉयोलॉजिकल सायन्स ही पदवी १९९५ साली बहाल करण्यात आली होती. या काळात तेथील संशोधन कार्यात असलेल्या संशोधकांशी चर्चा डॉ.दाणी यांनी केली.
कापूस या प्रमुख पिकाव्यतिरिक्त फळवर्गीय पिके, प्रामुख्याने डाळींबावरील संशोधनाचा फायदा विद्यापीठाला होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त कापूस जैवतंत्रज्ञान, खारपाणपट्टय़ासाठी तंत्रज्ञान, दुष्काळ प्रतिकारक्षम तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, रेशीम उद्योग व तंत्रज्ञान याविषयी उझबेकिस्तान येथील विविध संस्थांशी सांमजस्य करार करण्यास डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ उत्सुक असल्याची माहिती डॉ.दाणी यांनी दिली.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे चर्चा करून कृषी शिक्षण व संशोधनाच्या दृष्टीने सांमजस्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय कुलगुरू डॉ. दाणी यांनी अमेरिकेच्या टेक्सॉस टेक विद्यापीठासोबत ड्रॉट स्ट्रेस टॉलरन्स जनुक, एन.आर.सी.पी.बी.नवी दिल्ली सोबत सोयाबिनमध्ये तंबाखूची पाने खाणारी अळी व तूर पिकांमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचे प्रतिकारक्षम जनुक इत्यादींचा वापर करत रोधक वाण विकसित करण्यावर विद्यापीठ भर देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृषी विद्यापीठ व कापूस अनुसंधान केंद्र नागपूर यांच्याशी सांमजस्य करार करत पीडीकेव्ही ०८१ व रजत या दोन वाणांमध्ये बी.टी.जनुक टाकून शेतकरी वर्गाला बी.टी बियाणे देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला संशोधन संचालक डॉ.शिवाजी सरोदे, कृषी अधिष्ठाता डॉ.व्ही.एम.भाले, अधिष्ठाता प्रा.सदाशिव हिवसे, प्रा.सी.एन.गांगडे आदींची उपस्थिती होती.