पु. ल. देशपांडे युवा कला महोत्सवात मंगळवारी शाहिरांनी सादर केलेल्या पोवाडे आणि गीतानी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीचा परिसर दुमदुमून गेला. शाहीर मधू खामकर, शांताराम चव्हाण, भिकाजी भोसले, दत्ता ठुले, कृष्णकांत जाधव, निलेश जाधव, दादा मांजरेकर यांच्या पहाडी आवाजात शाहीरी जलसा रंगला. 

महोत्सवात मंगळवारीच कांचन सोनटक्के यांच्या ‘नाटय़शाळा’ संस्थेच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी ‘भरारी’हे नाटक सादर केले. नाटक या कलेकडे पाहण्याची एक नवी आणि वेगळी दृष्टी या नाटकाने प्रेक्षकांना दिली व एकही संवाद नसलेल्या या नाटकाने प्रेक्षकाना खिळवून ठेवले. शास्त्रीय गायक प्रशांत कळुंद्रेकर यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफलीतून पं. वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांना मानवंदना दिली. कल्पेश जाधव यांनी सादर केलेली मल्लखांबांची प्रात्यक्षिके पाहून उपस्थित प्रेक्षक अचंबित झाले. तर सकाळी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ हा चित्रपट दाखविण्यात आला.