महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे ८ ते १२ नोव्हेंबर दरम्यान पु. ल. देशपांडे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाने महोत्सवाची सुरुवात तर ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.
८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत देशभरातील वेगवेगळ्या दहा लोकनृत्य प्रकाराचे सादरीकरण होणार असून याच दिवशी रात्रीपासून ते पहाटे सहा वाजेपर्यंत विविध स्पर्धामधून पहिल्या आलेल्या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
९ नोव्हेंबर रोजी सकाळी युवा बासरीवादक नॅश नॉबर्ट व युवा शास्त्रीय संगीत गायिका दीपिका भिडे यांची मैफल होणार आहे.
सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ‘दिवस तुझे हे फुलायचे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मंगेश बोरगावकर, मिलिंद जोशी, अतुल परचुरे, वैशाली माडे, नंदेश उमप, गौरी कोठारी, समृद्ध पोरे हे सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता ‘मिशन मम्मी डॅडी’ हे नाटक सादर होणार आहे. सायंकाळी  साडेपाच वाजता ‘माणसापरीस मेंढर बरी’ हा दीर्घाक व त्यानंतर सात वाजता प्रसिद्ध गझल गायक भीमराव पांचाळे यांचा ‘एक जखम सुगंधी’ हा कार्यक्रम होणार आहे.
१० नोव्हेंबर रोजी भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मिलाफ असलेले १० रॉक बॅण्ड आपली कला सादर करणार आहेत. दुपारी चार वाजता प्रा. विसुभाऊ बापट यांचा ‘कुटुंब रंगलय काव्यात’ हा कार्यक्रम तर सायंकाळी ६ ते ११ या वेळेत शास्त्रीय नृत्यविष्कार सादर होणार आहेत. महोत्सवाच्या अन्य दिवसात ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, प्रशांत कळुंद्रेकर यांची शास्त्रीय मैफल, कर्णबधीर मुलांनी सादर केलेले नाटक, मल्लखांबाची प्रात्यक्षिके, शाहिरी जलसा, स्त्री जीवनात झालेल्या बदलांचे दर्शन घडविणारा ‘स्त्री विविधा, महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन घडविणारा ‘उत्सव महाराष्ट्राचा’, मयुर वैद्य यांचा ‘समा एक मैफल’ आदी कार्यक्रमही होणार आहेत.  
या कालावधीत अभिनय, रंगभूषा, आवाज जोपासना, वक्तृत्व, सूत्रसंचालन, चित्रकला, अर्कचित्र-व्यंगचित्र, रेखाटन, अक्षरलेखन, शास्त्रीय नृत्य आदी विविध विषयांवर सकाळी ११ ते ५ या वेळेत कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. युवा महोत्सवातील सर्व कार्यक्रम आणि कार्यशाळांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त युवा मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक  आशुतोष घोरपडे यांनी केले आहे.