‘पु.ल देशपांडे यांचे व्यक्तिमत्व हे कुठल्याही साहित्य प्रकाराच्या चौकटीत बांधू शकत नाही,साहित्यातल्या सगळ्याच प्रकारात त्यांनी चौफेर मुशाफिरी केली. या सगळ्या साहित्य प्रकारांना यंदाच्या पु.ल युवा महोत्सवात मानाचे स्थान मिळाले’, हे यंदाच्या महत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे युवा गीतकार अश्विनी शेंडे ,मंदार चोळकर,तेजस रानडे आणि समीर सावंत यांनी सांगितले. निमित्त होते या युवा गीतकारांच्या स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे. सोशल मिडीयावर विशेष चच्रेत असलेल्या या कार्यक्रमाला युवा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रशासनाच्या‘पु.ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी’तर्फे आयोजित पु.ल युवा महोत्सवात आज अखेरच्या आणि पाचव्या दिवशीची सुरवात ‘स्त्री विविधा ‘या कार्यक्रमाने झाली. प्राचीन काळापासून आतापर्यंत स्त्री जीवनात झालेल्या बदलांचा वेध घेणारा हा विशेष कार्यक्रम स्मिता आपटे यांनी सादर केला.
संध्याकाळी महाराष्ट्रातल्या लोककलेचे भव्य दर्शन घडवणारया ‘उत्सव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाने रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. मराठी मातीतल्या अनेक लोककलांचे एकत्र दर्शन एकाच व्यासपीठावर झाले. प्रख्यात नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्य यांनी ‘समा एक मफिल’ हा सुफी बॉलीवूड गाण्यांवर कथ्थक नृत्याविष्कार सादर केला. सुफी संगीत आणि कथ्थक यांचा अनोखा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमाचे रूप आधुनिक आहे. त्यामुळे तरुणाईचा ही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.