राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलीही संदिग्धता न ठेवता विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचीच उमेदवारी पुन्हा जाहीर करून टाकली. परंतु महायुतीतर्फे तुल्यबळ उमेदवाराचा शोध अजूनही सुरूच आहे. शिवसेनेकडून अजून कोणाचेही नाव निश्चित झाले नसल्याने इच्छुकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. पूर्वापार काँग्रेसकडे असलेल्या या मतदारसंघात १९९६मध्ये शिवसेनेचे शिवाजी कांबळे यांनी वर्चस्व मिळवून दिले  होते. नंतर १९९८ मध्ये मध्यावधी निवडणुका लागल्यानंतर काँग्रेसचे अरिवद कांबळे विजयी झाले. १९९९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कानिफनाथ देवकुळे यांचा पराभव करीत कांबळे यांनी या मतदारसंघावर पुन्हा सेनेचे वर्चस्व राखले. २००४ मध्ये सेनेकडून कल्पना नरहिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी राष्ट्रवादीचे लक्ष्मण ढोबळे यांचा अवघ्या १ हजार ६४९ मतांनी पराभव करीत सेनेचा गड राखला.
पुढे २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मोठय़ा प्रयत्नांनी सेनेकडून ही जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणली. सेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी त्या वेळी कडवी झुंज दिली. त्यांचा अवघ्या ६ हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. पवन राजेिनबाळकर यांच्या हत्येनंतर शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यक्ष लाभ उठविला.
आता येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्यमान खासदार डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना तुल्यबळ उमेदवार कोण द्यायचा, याचा शोध महायुतीकडून सुरू आहे. डॉ. पाटील यांच्या विरोधात लढत देण्यास आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील तानाजी सावंत (माढा), उद्योजक राजेंद्र मिरगणे (बार्शी), रवींद्र गायकवाड (उमरगा), मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेले उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील (उस्मानाबाद), माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील (परंडा) अशी भलीमोठी मांदियाळी सेनेकडून सध्या इच्छूक आहे. या बरोबरच सेनेचे उस्मानाबाद-कळंबचे आमदार ओमप्रकाश राजेिनबाळकर व त्यांची मातु:श्री आनंदीदेवी राजेिनबाळकर यांचे नावही चच्रेत असल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, औशाचे माजी आमदार दिनकर माने यांच्या पाल्याच्या लग्नसमारंभासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औसा येथे येऊन गेले. त्यावेळी झालेल्या गुप्त बठकीत डॉ. पाटील यांना शह देण्यासाठी सेनेच्या वतीने नवीन चेहरा िरगणात उतरविण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार नवीन चेहऱ्यास सेनेच्या वतीने संधी दिल्यास इच्छुकांची दांडी गुल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नवीन चेहरा कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.