जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणात धानपिकाचे नुकसान झालेले आहे. शासनाने क्रांतिकारी निर्णय घेऊन धानासाठी ७ हजार ५०० रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य व पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांनी केले.
चार्मोशी तालुक्यातील अनखोडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, खासदार मारोतराव कोवासे, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती वर्षां भांडेकर, उपसभापती मनमोहन बंडावार, उपविभागीय अधिकारी देवेंद्र सिंह उपस्थित होते.
देवतळे म्हणाले, पूर्वी बोटावर मोजता येईल इतक्याच शाळा होत्या. आता शासनाने गाव तेथे शाळेची व्यवस्था निर्माण केली आहे. शिक्षणाचे महत्त्व जाणून शिक्षकांनी संस्कारक्षम शिक्षण देऊन उत्तम नागरिक घडवावे. अनखोडा येथील शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर काम करीत आहेत. दर्जेदार शिक्षणामुळे ते शक्य झाले आहे. यापुढेही शाळेने ही परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी खा.कोवासे यांनी गडचिरोली-वडसा रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगून अनखोडा येथील शाळेच्या विकासासाठी खासदार फंडातून १० लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले. आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांपासून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे सांगून विद्यार्थ्यांकरिता शाळेला दोन संगणक देण्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, आमदार सुभाष धोटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे यांचीही भाषणे झाली. माजी विद्यार्थी मनोहर पालारपवार, अशोक झाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते शाल-श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी नानाजी विटपल्लीवार, संदुरदास उंदिरवाडे, नामदेव कातलाम, सुधा वडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक झोडे, मनाजी पोटे, एस. एस. भांडारकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.