एका दिवसात झाले एक हजारांहून अधिक सभासद
डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीने एका दिवसात एक हजारांहून अधिक नवे सभासद करून घेतले आहेत. लायब्ररीची ही लक्ष्यपूर्ती १ जानेवारी २०१५ रोजी झाली. नववर्षांच्या पहिल्या दिवशी एक हजारांहून अधिक नवे सभासद करून घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला आणि दिवसभराच्या अखेरीस १ हजार २१ नव्या सभासदांची नोंदणी करण्यात आली.
पुंडलिक पै यांनी २२ मे १९८६ रोजी डोंबिवलीत टिळकनगर विभागात १०० पुस्तकांसह ग्रंथालय सुरू केले. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या डोंबिवलीत आज सहा शाखा असून ७ हजारांहून अधिक सभासद आहेत. ग्रंथालयात विविध भाषांतील १ लाख ८० हजार ६६० पुस्तके आहेत. पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे मुंबई, पुणे, नाशिक येथील साहित्यप्रेमींसाठी ‘ऑनलाइन’ ग्रंथालय चालविण्यात येते. त्यांना पाहिजे असलेले पुस्तक त्यांच्या घरी पोहोचविले जाते. या ऑनलाइन ग्रंथालयाचेही २ हजार सभासद आहेत.  
वाचन-संस्कृतीचा अधिकाधिक प्रसार व्हावा, लोकांमध्ये विशेषत: तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रंथालयाचे अस्तित्व टिकून राहावे, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम हाती घेतला. डोंबिवलीतील बँका, शाळा, विविध संस्था येथे आम्ही संपर्क साधून नवीन सभासद मिळविण्यासाठी प्रयत्न केले. आमच्या विद्यमान सभासदांना त्यांनी एक नवीन सभासद करावा, असे आवाहन केले. काही जणांशी पत्राने तर काहींशी  प्रत्यक्ष संपर्क साधला आणि डोंबिवलीकर सुजाण वाचकांनी, साहित्यप्रेमींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ६-४० वाजता पहिल्या सभासदाची तर रात्री साडेदहा वाजता १ हजार २१ व्या सभासदाची नोंदणी करण्यात आली. या उपक्रमाची ‘लिम्का बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’साठी नोंद व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पुंडलिक पै यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.