मोतीबाग तालीम कोल्हापूरचा मल्ल पै. संदीप वाळकुंजे याने बाराव्या मिनिटातच एकलंगी डावावर न्यू मोतीबाग तालीम कोल्हापूर पै. जितेंद्र कदम यास अस्मान दाखविले. श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशहा उरसानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत पार पडले. या मैदानात खुल्या, लहान, मध्यम, मोठय़ा अशा गटात ७५ हून अधिक निकाली कुस्त्या झाल्या. विजेत्या पैलवानांना रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात आले.
बुवाफन मंदिरासमोर असणाऱ्या कुस्ती आखाडय़ात बुधवारी कुस्ती झाल्या. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्ती आखाडय़ाचे पूजन करून मैदानाची सुरुवात झाली. मैदानात प्रथम लहान, मध्यम, मोठय़ा, खुल्या याप्रमाणे उपस्थित पैलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. कुस्तीजिंकल्यानंतर उपस्थित कुस्ती शौकिनांनी विजेत्या पैलवनाचा टाळ्यांचा गजर करून अभिनंदन केले. रोमांचक कुस्तीलाही दाद दिली.
पहिल्या क्रमांकाची कुस्ती मोतीबाग तालमीचा पै.संदीप वाळकुंजे विरुद्ध पै. न्यू मोतीबाग तालमीचा पै जितेंद्र कदम यांची कुस्ती. आमदार डॉ. सा.रे.पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. दोन्हीही पैलवान ताकदीने समान असल्याने कुस्ती रोमांचक झाली. बाराव्या मिनिटास पै. वाळकुंजे याने पै. कदम यास एकलंगी डावावर अस्मान दाखविले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती गंगावेस तालीम कोल्हापूरला सचिन पुजारी विरुद्ध सेनादल बेळगावच्या पै. पुंडलिक धादे यांच्यात झाली. अवघ्या नऊ मिनिटांतच घिस्सा डावावर पै. पुजारी याने पै. घारे यास चीतपट केले. क्रमांक तीनची कुस्ती पवार तालीम सांगलीचा पै. नाथा पालके विरुद्ध आबाडे अॅकॅडमीचा पै. बाळू पोरले यांच्यात पंधरा मिनिटे कुस्ती चालली. पै. पालवे यांनी घुटणा डावावर पै. पोरले यास अस्मान दाखविले.
विजेत्या सर्व पैलवानांना आमदार डॉ. सा.रे.पाटील, तालुका काँग्रेसेचे अध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोक माने, दत्तचे संस्थापक युसूफ मेस्त्री, राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू दीपक बागल या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.