सोशल नेटवर्कीगमुळे फेसबुक आणि मोबाईलच्या माध्यमातून घरोघरी उमेदवारांचा होत असलेला जनसंपर्क आणि त्यातच निवडणूक आयोगाने प्रचारासंदर्भात लावलेल्या निर्बंधांमुळे पेंटर आणि फलक तयार करणाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. पूर्वी कुठल्याही निवडणुका असल्या की पेंटरच्या हाताला मोठय़ा प्रमाणात काम मिळत असे, आता मात्र संगणकामुळे ते कमी झाले आहे.
निवडणुका असो की कुठल्याही राजकीय पक्षांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या की उमेदवारांच्या नावांचे मोठे पोस्टर आणि फलक रंगविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पेंटरला कामे मिळत होती. मात्र, गेल्या चार पाच वर्षांत संगणकामुळे पाहिजे त्या आकारात आणि हवे तसे पोस्टर आणि होडिँग तयार केले जात असल्यामुळे पेंटरच्या हाताला काम मिळणे आता बंद झाले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराला प्रचाराच्या दृष्टीने आपापल्या भागात मोठे पोस्टर आणि बॅनर आवश्यक झाले आहे. त्यामुळे त्याची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
एरवी गणपती, दुर्गा उत्सवमध्ये व्यस्त असलेल्या पेंटरला वर्षभर फारसे काम नसायचे. दर पाच वषार्ंनी होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पेंटरच्या हातांना कामे मिळून मोठय़ा प्रमाणात आर्थिक लाभ होत असे.
मात्र, गेल्या दोन तीन वर्षांतच पोस्टर रंगविण्याचे काम कमी झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा कामाला लागली असून उमेदवारांनी प्रचार साहित्याची जमवाजमव सुरू केली आहे. पूर्वी उमेदवारांच्या नावाने लोकांचा घराच्या भिंती रंगविल्या जात होत्या.
आता निवडणूक आयोगाने त्यावर निर्बंध लावले आहे. शिवाय घरमालकांच्या परवानगी शिवाय घराच्या भिंती रंगविणे म्हणजे गुन्हा आणि त्यामुळे संबंधित उमेदवाराला शिक्षा होत असल्यामुळे भिंती रंगविण्याचा प्रकार कमी झाला आहे.
उमेदवारांच्या नावाने मोठय़ा प्रमाणात पोस्टर रंगविण्याचे काम पेंटरकडे असायचे, आज तेसुद्धा संगणकामुळे कमी झाले आहे. आज संगणकामुळे कमी वेळात जास्तीत जास्त व आकर्षक असे देखणे पोस्टर तयार करून मिळतात.
अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते पेंटरकडे न जाता संगणकाच्या माध्यमातून पोस्टर तयार करण्याकडे धाव घेतात. निवडणुकीला सात दिवसांचा अवधी शिल्लक असून आजही चितारओळीतील किंवा महालातील अनेक पेंटरकडे काम नाही. चितारओळ, जागनाथ बुधवारी, दसरा रोड, सीताबर्डी या भागात अनेक पेंटर पोस्टर रंगविण्याचे काम करतात. त्यांना निवडणुकीचे कामे मिळणे कठीण झाले आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या खर्चावर लावलेला लगाम आणि प्रचारासाठी भिंती आणि पोस्टर तयार करण्यावर मर्यादा आणि संगणकामुळे मोठे पोस्टर तयार करण्याची सोय झाल्यामुळे पोस्टर रंगविण्याचे काम कमी झाले आहे. साधारणत: एक मोठे पोस्टर तयार करण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. मात्र, संगणकामुळे ते काम एक ते दीड हजारात होत असल्यामुळे उमेदवार त्यांच्याकडून पोस्टर तयार करून घेतात. मूर्तीकार आणि पेंटर दीनानाथ पडोळे आमदार झाल्यानंतर त्यांनी मूर्तीकारांच्या आणि पेंटरच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासंदर्भात समस्या कायम आहेत. निवडणुकीत लागणारे झेंडे, बॅनर, पोस्टर, बिल्ले, या वस्तू संगणकाच्या सहाय्याने तयार होत असल्यामुळे पेंटरकडे उमेदवारांनी आणि कार्यकत्यार्ंनी पाठ फिरविली आहे.