आदिवासी मंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या ‘वाघाने शिकार करायची..’ या वक्तव्याचे तीव्र पडसाद कर्जत व श्रीगोंदे तालुक्यात उमटत आहेत़  काँग्रेसने त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून मुख्यमंत्र्यांपेक्षा आदिवासी मंत्री मोठे आहेत का, असा सवाल विचारला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे दुष्काळातही सीनेचे पाणी पेटले आहे.
कर्जत तालुक्यातील सीना धरणात कुकडीचे पाणी आले, मात्र त्यानंतर कोणाच्या कोंबडय़ाने दिवस उगवला यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये श्रेय घेण्यावरून चढाओढ लागली आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. घोगरगाव व निमगाव येथील कार्यक्रमता पाचपुते यांनी प्राण्यांच्या विशेषणांनी थेट मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांसह काँग्रेसवर बोचरी टिका केली होती.
पाचपुते यांच्या त्या वक्तव्याचा आज कर्जत तालुका काँग्रेसने पंचायत समितीचे उपसभापती किरण ढोबे यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, बापूसाहेब काळदाते, संभाजी अनारसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पांडुळे म्हणाले की, पाण्यासाठी आम्ही उपोषण केले. नंतर बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यावेळी सीना धरणात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांमुळेच पाणी मिळाले आहे.
पाचपुतेंवर टिका करताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांपेक्षा आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा मंत्री मोठे आहेत का? स्वत:ला पालकमंत्री म्हणता, मग पालकाची जबाबदारीही पार पाडा. मिरजगाव परिसरामुळे ३० वर्षे आमदार होतात, त्यावेळी श्रीगोंदे ही आई व कर्जत ही मावशी म्हणत होते. मग आता मावशीवर पुतणामावशीसारखे प्रेम करता का? आम्हाला साध्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे कारण काय, असा सवालही पांडुळे यांनी केला.