सोलापूर-हैदराबाद मार्गावर रविवारी पहाटे झालेल्या अपघातात कोल्हापूर जिल्हय़ातील नऊ व सांगली जिल्हय़ातील एक असे दहाजण ठार झाले. यातील नऊजण पन्हाळा तालुक्यातील आहेत. अपघाताचे वृत्त कळल्याने शहापूर, सातवे व कोडोली या तीन गावांवर आज शोककळा पसरली होती.
     तिरुपती येथे बालाजी दर्शनासाठी तवेरा गाडीतून हे सर्वजण निघाले होते. हुमनाबाद (जि.बिदर) येथे तवेरा आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. पहाटे चार वाजता झालेल्या अपघातात दहाजण ठार झाले. त्यामध्ये विजय जगन्नाथ शेटय़े (वय ३५), पत्नी अर्चना विजय शेटय़े (वय ३०), मुलगा अभिषेक विजय शेटय़े (वय ८), मुलगी वैष्णवी विजय शेटय़े (वय १३), शहाजी बळवंत शेटय़े (वय २८), महिपती ज्ञानू शेटय़े (वय ५५ सर्व रा. शहापूर, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर), श्यामराव पांडुरंग जाधव (वय ५५, रा. सातवे), कुसुम श्यामराव जाधव (वय ४९, रा. सातवे), विश्वास नारायण खामकर (वय ४०, रा.मांगले), अशोक चव्हाण (वय २२, रा.कोडोली) यांचा समावेश आहे. अपघातात ठार झालेले नऊजण पन्हाळा तालुक्यातील तीन गावांतील आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. शहापूर येथील सर्वाधिक सहाजण ठार झाले. सातवे येथील दोन तर कोडोली येथील एकजण ठार झाला. शहापूर गावावर तर आज शोककळा पसरली होती. तेथील व्यवहार आज बंद होते. अशीच परिस्थिती सातवे व कोडोली गावांवर होती. अपघाताचे वृत्त कळाल्यानंतर नातेवाइकांनी अपघातस्थळी धाव घेतली होती.