पाकिस्तानी सैन्यांनी केलेल्या गोळीबारात वीरगती प्राप्त झालेल्या कुंडलिक केरबा माने यांचे पिंपळगाव बुद्रुक हे गाव गुरुवारी शोकसागरात बुडाले. अवघ्या कोल्हापूर जिल्हाभर दु:खाचे सावट पसरले होते. गेले तीन दिवस शहीद कुंडलिक माने यांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत असलेल्या अलोट जनसागराला त्यांचे अंत्यदर्शन झाल्यावर अश्रू आवरणे कठीण झाले होते. माने कुटुंबीयांचे दु:ख सावरताना अनेकांना अश्रूंचा बांध रोखता आला नाही. गावातल्या चुली बंद ठेवून चिमुकल्या विद्यार्थ्यांसह अवघे पिंपळगावकर अंत्यात्रेमध्ये सहभागी झाले होते. साऱ्या गावावर करुणरस दाटला होता. ‘शहीद कुंडलिक माने अमर रहे’च्या अखंडित घोषणा दिल्या जात असताना पाकिस्तानविषयीचा संताप पदोपदी व्यक्त होत राहिला.    
सोमवारी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारामध्ये कुंडलिक माने यांना वीरमरण आले होते. ते शहीद झाल्याचे वृत्त गावकऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर संपूर्ण पिंपळगाव सुन्न बनले होते. गेले तीन दिवस ग्रामस्थ, माने यांचे नातेवाईक शहीद माने यांच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत होते. तर माने कुटुंबीयांची अवस्था सैरभैर बनली होती. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माने कुटुंबीयांना कुंडलिक माने यांना वीरगती प्राप्त झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. वीरपत्नी राजश्री, वीरमाता नानूबाई, वडील केरबा, भाऊ विजय, भावजय पद्मा यांच्या आक्रोशाने उपस्थितांच्या डोळय़ांतूनही अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आरती व अमोल या बालकांनी आईच्या गळय़ात पडून अश्रूंना वाट करून दिली. रात्रभर आक्रोश आणि हुंदके यांचेच आवाज पिंपळगावात येत राहिले.     
गुरुवारी कोल्हापूरहून शहीद माने यांचे पार्थिव निघाल्याचे समजल्यापासून पिंपळगावात लगबग वाढली होती. आपल्या घरचाच माणूस अंतरल्याच्या भावनेने ग्रामस्थ शोकसागरात बुडाले होते. शहीद माने यांचे पार्थिव त्यांच्या घरासमोर अंत्यविधीसाठी ठेवण्यात आले तेव्हा लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वाना अश्रू रोखणे कठीण झाले होते. घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी रेखाटण्यात आली होती. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी अश्रू आवरत मिरवणुकीने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. ‘शहीद कुंडलिक माने अमर रहे’, ‘वीरजवान अमर रहे’, ‘शहीद कुंडलिक माने तुला सलाम’ अशा आशयाचे छायाचित्रासह फलक त्यांनी हाती घेतले होते.     पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात कुंडलिक माने यांना वीरगती प्राप्त झाल्याने सर्वाच्याच तोंडातून पाकिस्तानविषयीची चीड व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात होत्या. सैन्यदलाच्या वतीने संचलन करण्यात आले. सुशोभित केलेल्या वाहनातून पार्थिव गावाच्या मुख्य मार्गावरून जात असताना अखेरचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. पाय ठेवायलाही जागा मिळू नये, असा अलोट जनसागर तेथे जमला होता.    
गेल्या दोन दिवसांपासून गावामध्ये अंत्यविधीची तयारी केली जात होती. गावाच्या उत्तरेस असलेल्या पटांगणात अंत्यविधीसाठी खास चबुतरा उभारण्यात आला होता. तेथे पार्थिवाला मंत्राग्नी दिल्यावर उपस्थितांनी ‘शहीद कुंडलिक माने अमर रहे’ असा जयघोष करीत अखेरचा निरोप दिला. कुंडलिक माने यांचे वडील केरबा माने यांनी कुंडलिकचे रक्त वाया जाऊ नये यासाठी पाकिस्तानला धडा शिकविला पाहिजे, असे सांगून शासनाने त्वरित कृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली.