रेल्वेत अनोळखी बॅग सापडली आणि त्या बॅगेतून मोबाइलसारखा येणाऱ्या आवाजामुळे गाडीतील प्रवाशांसह सर्वाची घाबरगुंडी उडाली. त्यामुळे या बॅगेत बॉम्ब असण्याची भीती क्षणार्धात पसरायला वेळ लागला नाही. अखेर लोहमार्ग पोलिसांसह सोलापूर शहर पोलिसांचे पथक रेल्वेस्थानकात धावून आले. बॅगेची बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली आणि समाधानाचा सुस्कारा सोडला.
सोमवारी सकाळी सोलापूर रेल्वेस्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा सुमारे चार तास कामाला लागली होती. सकाळी आठ वाजता यशवंतपूर-विजापूर गाडी सोलापूर स्थानकात आली तेव्हा गाडीच्या एका बोगीत प्रवाशांना एक प्लॅस्टिकची अनोखळी बॅग आढळली. या बॅगेत मोबाइलसारखा आवाज येत होता. त्यामुळे त्यात बॉम्ब तर नसावा या संशयाने सर्वाची घाबरगुंडी उडाली. प्रवाशांनी ही बाब स्टेशनमास्तरांच्या कानावर घातली व त्यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिसांना कळविले. दरम्यान, रेल्वेस्थानकात बॉम्ब सापडल्याची अफवाही पसरली. लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चव्हाण यांनाही संशय वाटल्याने सोलापूर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार थोडय़ाच वेळात शहर पोलीस आयुक्तालयातील बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल झाले. या पथकाने सदर अनोळखी प्लॅस्टिक बॅगेची तपासणी केली असता त्यात बॉम्ब किंवा कोणतीही घातक वस्तू आढळली नाही, तर मोबाइल संच आढळला. मोबाइलमधील बॅटरी संपत आल्यामुळे त्याचा आवाज येत होता. दुपारी बारापर्यंत ही तपासणीची प्रक्रिया सुरू होती. विशेषत: हैदराबाद येथील बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर पोलीस यंत्रणेने कोणतीही जोखीम न पत्करता आपले कर्तव्य पार पाडले.