ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी साजरा होणारा पं. राम मराठे स्मृती संगीत महोत्सव यंदा १४ ते १७ नोव्हेंबर दरम्यान गडकरी रंगायतन गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पं. राजन-साजन मिश्रा, पं. जयतीर्थ मेवुंडी, सतार वादक पं. रविंद्र चारी यांचे सादरीकरण तसेच ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांचे गाजलेले ‘संगीत कुलवधू हे नाटक सादर केले जाणार आहे.
गुरूवारी ठाण्यातील प्रसिद्ध शहनाई वादक पं. शैलेश भागवत यांच्या सनई वादनाने महोत्सवाची सुरूवात होईल. त्यानंतर दिवंगत जयमाला शिलेदार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘गंधर्व युगाची शिलेदार हा नाटय़ संगीताचा विशेष कार्यक्रम सादर केला जाईल.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नृत्यांगना मनाली देव कथ्थक सादर करणार आहेत. त्यांना मुकुंदराज देव तबला साथ करतील. त्यानंतर दिल्लीचे गायक के. व्यंकटेश्वरन यांचे कर्नाटक शैलीतील गायन होईल. रात्रीच्या सत्रात हेमा उपासनी यांचे गायन होईल. इंदुरच्या प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर यांच्या गायनाचे सत्राचा समारोप होईल.
शनिवारी पहिल्या सत्रात मुक्ता जोशी यांचे कथ्थक नृत्य होईल. त्यानंतर रात्रीच्या सत्रात राजन-साजन मिश्रा यांचे गायन होईल. रविवारी दुपारी संगीत कुलवधू हे नाटक होईल, तर रात्री रविंद्र चारी यांच्या सतारवादनाने महोत्सवाची सांगता होईल.