पनवेल शहरातील नागरी पायाभूत समस्यांकडे पनवेल नगर परिषदेने लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी येथील नागरिकांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता वीर सावरकर चौकातून निघणाऱ्या या मोर्चाचे आयोजन सिटिझन युनिटी फोरम (कफ)आणि जनजागृती ग्राहक मंचाने केले आहे. रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी नगर परिषदेला सामाजिक संघटनांनी एक महिन्याचा अवधी दिला होता. तसा लेखी पत्रव्यवहार नगर परिषदेकडे केला होता. मात्र तरीही प्रशासनाची कार्यपद्धती ढिम्म राहिल्याने सामान्य पनवेलकरांना नाईलाजास्तव मोर्चा काढावा लागत आहे, असे कफचे अरुण भिसे यांनी सांगितले. या मोर्चाला शहरातील ५० सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती कफच्या वतीने दिली आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, बेकायदा फेरीवाले, अपुरा पाणी पुरवठा या प्रमुख मागण्या रहिवाशांच्या आहेत. या मोर्चामध्ये सामान्य पनवेलकरांनी सामील व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.