तळोजा पाचनंदनगर व नावडे नोड या दोन वसाहतींमध्ये सार्वजनिक  सुविधा आणि सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत सिडको आणि पोलीस प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देत नसल्याबद्दल त्यांच्या कारभाराविषयी येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
तळोजा पाचनंदनगर व नावडे नोड वसाहती प्रदूषणाच्या विळख्यात गुरफटल्या गेल्या आहेत. या दोनही वसाहतींमध्ये उद्याने, फेरीवाला क्षेत्र अद्याप उभारलेले नाहीत. सध्या पाचनंदनगरची लोकसंख्या वीस हजारांहून अधिक आहे तर नावडे वसाहतीमध्ये पाच हजारांहून अधिक रहिवासी राहतात. तरीही या रहिवाशांसाठी येथे पोलीस ठाण्याची जागा सिडकोने उपलब्ध केलेली नाही, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. नावडे व तळोजा वसाहतींमध्ये बाजारपेठ नसल्याने अनधिकृत हातगाडय़ांनी रस्त्यावर हातपाय पसरले आहेत. येथे घरगुती गॅसपुरवठा करणाऱ्या एजन्सीचे कार्यालय नाही. पाचनंदनगरमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीचे घरगुती गॅसपुरवठय़ाचे कार्यालय नुकतेच सुरू झाले आहे परंतु  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे कार्यालय नाही. घरगुती गॅस अचानक संपल्यास तो आणण्यासाठी येथील रहिवाशांना दोनशे रुपये वाहतूक खर्च करून कळंबोलीहून गॅस सिलेंडर आणावा लागतो. अशीच परिस्थिती सुरक्षेबाबत आहे. तळोजा पाचनंदनगरमध्ये राहत असलेल्या सदनिकेत चोरटय़ाने चोरी केल्यास तक्रारदाराला वसाहतीपासून दूर अंतरावर असलेले तळोजा पोलीस ठाणे गाठावे लागते. त्यासाठी दोनशे रुपयांचे आर्थिक भरुदड सोसावा लागतो. तळोजा नोडमध्ये आजही पिण्याचे पाण्याचा पुरवठा दिवसभरातून एक तास होतो. तळोजा वसाहतींमध्ये पोलिसांचा वावर कमी असल्याने येथे भंगार विक्रेत्यांनी अनेक बेकायदा दुकाने थाटली आहेत. तळोजा पाचनंदनगरमध्ये पंधरा दिवसांनी एकदा कचरा उचलण्याची नवी पद्धत सिडकोने राबविल्याने येथे ठिकठिकाणी रस्त्याच्या चौकांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य दिसते, असे येथील लक्ष्मीनारायण व्यापारी कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष गुरुनाथ केणी यांनी सांगितले. फेरीवाला क्षेत्रासाठी सिडकोने जागा उपलब्ध करून दिल्यास वसाहतीचे विद्रूपीकरण थांबेल. या मागणीसाठी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत, परंतु सिडकोने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
तळोजा वसाहतीचा कचरा प्रत्येक दीड दिवसांनी उचलला जातो. मात्र एखाद्या रहिवाशांनी संपर्क करून तक्रार केल्यास येथे कचरा उचलण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. तरीही नागरिकांनी तळोजा फेज-२ च्या कचऱ्यासंबंधीच्या तक्रारीसाठी  ८०९७७०५८१९ या माझ्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला तरी चालेल. वसाहतीमध्ये असणारी लोकसंख्या ६० टक्केच आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडलेला नाही. येथील लोकसंख्येच्या कमतरतेमुळे येथे फेरीवाला क्षेत्र अद्याप नियोजन केलेले नाही. पोलीस ठाण्यासाठी सेक्टर-१२ येथील उदेयन केंद्रालगतचा सुमारे ५०० मीटरचा भूखंड राखीव ठेवला आहे. पोलीस आयुक्तांच्या मागणीनंतर येथेही पोलीस ठाण्याचे काम सुरू होईल. तळोजा फेज-१ येथे सहा तर फेज-२ येथे पाच उद्यानांच्या भूखंडांना कुंपण घालण्याचे काम सुरू आहे. पुढील वर्षांपर्यंत या भूखंडावर उद्याने उभारली जातील.
यु अे घाटेराव, सहायक कार्यकारी अभियंता, सिडको

तळोजाप्रमाणे पाण्याचे दुर्भिक्ष सगळीकडे आहे. तळोजा पाचनंदनगरला सध्या खारघरमधून पाणीपुरवठा केला जातो. ही जलवाहिनी सध्या दूर अंतरावर असल्याने पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होतो. त्यामुळे पाचनंदनगरसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवरून पेणधर गावाकडून नवीन जोडणी घेण्याचे काम सुरू आहे. सहा दिवसांत येथील पाणीपुरवठा सुरळीत होईल. सध्या पाचनंदनगरमधील नागरिकांची मागणी तीन दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाण्याची आहे. एमआयडीच्या जलवाहिनीकडून पाणीपुरवठा सुरू झाल्यास अजून तीन एमएलडी पाणी मिळेल.
-एन. आर. निमकर, पाणीपुरवठा विभाग मुख्य अभियंता, सिडको