मळलेली वाट धरून अनेकजण विक्रम करतात. मात्र पनवेलच्या आठ वर्षीय सुचित संदेश पाटीलने अरबी समुद्रातील घारापुरी(एलिफंटा) ते कासा (अलिबाग) हे अठरा किलोमीटरचे सागरी अंतर अवघ्या ३ तास ४७ मिनिटांत पार करून विक्रम नोंदविला आहे.
मोरा ते गेटवे, धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहून जाण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. मात्र पनवेलच्या सुचित पाटीलचे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संतोष पाटील यांनी सुचितला घारापुरी ते कासा असे अंतर पार करण्याचे आव्हान दिले. दोन ते तीन महिने सुचितने संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरावही केला. या सरावादरम्यान अनेक अडचणी आल्या. सुचितचे वडील मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले. त्यामुळे त्यांचा वडिलांशी कधी संबंध आला नाही. मात्र मुलाला पोहण्याची आवड असल्याचे पाहून त्यांनी सुचितला प्रोत्साहन दिले.
पनवेलमध्ये वास्तव्यास असूनही सरावासाठी सुचित उरणमध्ये येत होता. त्याचे प्रशिक्षक संतोष पाटील यांच्या सोबतच अजय ठाकूर यांनीही सुचितला मदत केली. अवघ्या आठ वर्षांचा सुचित घारापुरीसारख्या ठिकाणावरून जेथून जेएनपीटीची महाकाय जहाजे ये-जा करीत असतात, तेथून कसा पोहणार ही शंका होती. त्याचप्रमाणे समुद्रातील पाण्याच्या करंटचाही परिणाम या लहानग्यावर होण्याची भीती होती. मात्र हे अंतर सुचित सहज पार करेल, असा विश्वास संतोष पाटील यांना वाटत होता. त्यानुसार पहाटे पाच वाजून ४५ मिनिटांनी सुचितने पोहण्यास सुरुवात केली आणि १८ किलोमीटरचे अंतर पार केले. त्याबद्दल सुचितचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.