पनवेल तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राष्ट्रीय पातळीवर खटाटोप करणारे सरकार पनवेलच्या ग्रामीण परिसराला १० तासांसाठी अंधाराच्या वीजसंकटापासून वाचविण्यासाठी हातावर हात ठेवून गप्प आहे. एकीकडे विमानतळाची स्वप्ने दाखवायची आणि दुसरीकडे १० तास विजेविना परिसर ठेवायचा, सरकारच्या या दुटप्पीपणामुळे राज्य सरकारविषयी पनवेलचा ग्रामीण परिसर संताप व्यक्त करत आहे. महावितरण कंपनीने या संकटामध्ये अजूनही तेल ओतले आहे.
पनवेलच्या शहरातील वीज ग्राहकांना खुशीत ठेवण्यासाठी ग्रामीण परिसराची वीज महावितरण कंपनीने शहरी भागाकडे वळविली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ महावितरणच्या कारभाराविषयी संतप्त झाले आहेत. पनवेल-उरण तालुक्यातील घरगुती वीज ग्राहकांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. त्यापैकी उरण परिसरात ४० हजार वीज ग्राहक ग्रामीण परिसरातील आहेत. पनवेलमधील नेरे, तळोजा या फीडरवरली २५ हजार वीज ग्राहक आहेत. पनवेल-उरण तालुक्यातील वीज ग्राहक महिन्याला ३५ कोटी रुपये विजेच्या बिलापोटी जमा करतात. पनवेल-उरण तालुक्यातील शहरी भागातील वीज ग्राहकांची संख्या वाढल्याने या ग्राहकांना दुखवून महावितरण कंपनीला परवडणारे नसल्याने विजेची ही फिरवाफिरवी करण्यात येत असल्याचे महावितरणच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शहरातील वीज ग्राहक रात्री घरातील वातानुकूलित यंत्राचा मोठय़ा संख्येने उपयोग करतात. त्यामुळे सायंकाळी सात वाजल्यानंतर शहरी परिसराचा विजेचा भार वाढतो. विजेची मागणी वाढल्याने सबस्टेशनमधील वीज नियंत्रणासाठी बसविण्यात आलेले रिले क्षमतेपेक्षा जास्त वीज वापर झाल्याने ट्रिप होतात. त्यामुळे शहरी भागात वारंवार वीजप्रवाह खंडित होतो. यासाठी या रिलेची क्षमता काही ठिकाणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाढविली आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, अशांना विजेशिवाय जगणे कठीण झाल्याने गावातील आपले हक्काचे घर सोडून सिडको नोडमध्ये हजारो रुपये खर्चून आपल्या संसाराची चूल मांडली आहे.
 पनवेलचा ग्रामीण परिसर विजेविना आठ ते दहा तास होरपळत असताना त्यांच्या हक्काची वीज शहरी भागात वळविल्याने आर्थिक सबळ नागरिक एसीच्या गार हवेत आपली निद्रा पूर्ण करत आहेत. आमदार विवेक पाटील (रा. नवीन पनवेल), आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल शहर), रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कविता गायकवाड (रोडपाली), काँग्रेस नेते रामशेठ ठाकूर (पनवेल), आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड (रोडपाली), शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील (कळंबोली), भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील (पनवेल), राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमसेन माळी (नवीन पनवेल) हे दिग्गज नेते २४ तास वीज असलेल्या शहरी भागात राहतात. पनवेलच्या विविध राजकीय पक्षांच्या या दिग्गजांनी पनवेलच्या ग्रामीण परिसराला भारनियमनापासून मुक्ती मिळावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले. काहींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिली. तशी छायाचित्र आणि बातम्या वर्तमानपत्रातून छापून आणल्या. काहींनी वीजमंत्र्यांची भेट घेतली. तरीही ग्रामीण परिसरातील हे वीज संकट दूर होऊ शकले नाही. या परिसरातील वीजगळती, वीजचोरी रोखण्यासाठी वीज ग्राहकांचे प्रबोधन न केल्यामुळे ही वेळ ग्रामीण परिसरावर आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून पनवेलचा ग्रामीण परिसरातील ग्रामस्थ रोजचे आठ ते दहा तासांचे विजेचे भारनियमन सहन करत जगत आहेत. शहरी भागात १० मिनिटांसाठी वीज गुल झाल्यास महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडते. मात्र ग्रामीण परिसरात वर्षांपासून तासन्तास विजेविना जिवाची काहिलीबाबत कोणाला जाब विचारू शकत नाही, अशी व्यथा पनवेलच्या ग्रामस्थांची आहे.
अखंडित विजेसाठी मुख्य अभियंता सुधीर वडोदकरांची पनवेलमध्ये हजेरी
पनवेलवरील विजेच्या संकटाची बातमी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध होताच वीज महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुधीर वडोदकर यांनी तातडीने पनवेलच्या वीज महावितरणच्या कार्यालयाला भेट दिली.  खंडित विजेच्या प्रवाहाविषयी माहिती घेतली. ग्रामीण परिसरामध्ये होणाऱ्या दहा तासांच्या भारनियमनाविषयी वडोदकर म्हणाले, की पनवेलच्या वावंजा आणि पनवेल फीडरवर सुरू असणारे वीज भारनियमन गेल्या महिन्याभरापासून जी वर्गवारीत आले आहे. अजून दोन महिने या परिसरातील वीज ग्राहकांनी वेळीच वीज बिल भरल्यास आणि वीजचोरी थांबविल्यास ऑगस्ट महिन्यापासून पनवेल पूर्णपणे भारनियमनमुक्त करण्यात येईल.  
आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो प्रकल्प पनवेल परिसरात झाल्यास त्यासाठीचे महावितरण कंपनीचे विजेसाठी पूर्णपणे नियोजन करण्यात आले आहे. वीज यंत्रणेची क्षमता वाढविण्यासाठी रोडपाली, नेरे येथील महालक्ष्मी, बालाजी विकासक कंपनी येथे नवीन सबस्टेशन उभारण्याचे काम ६ महिन्यांत सुरू होईल. नावडे, पनवेल व कामोठे स्विचिंग स्टेशनमधील रोहित्रांची क्षमता वाढविणे अशी कामे सुरू आहेत. पनवेलच्या कल्पतरू येथील रोहित्राची क्षमता वाढविण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येईल.  पनवेल रेल्वे स्थानकाजवळील सिडकोच्या मालकीचा भूखंड हस्तांतरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही जागा मिळाल्यास पनवेलसाठी १०० बाय २०० केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यासाठी दोन वर्षे लागतील. दर दोन महिन्यांनी वडोदकरांनी पनवेलकरांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पनवेलला भेट देण्याचे आश्वासन या वेळी दिले.