20 September 2020

News Flash

पश्चिम रेल्वेवर लवकरच ‘पेपरलेस’मोबाइल तिकीट

तिकिटासाठी किंवा मोबाइलवर काढलेल्या तिकिटाची छापील प्रत घेण्यासाठी रांगेत उभे राहून मौल्यवान वेळ खर्ची घालणाऱ्या मुंबईकरांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे.

| June 13, 2015 02:18 am

तिकिटासाठी किंवा मोबाइलवर काढलेल्या तिकिटाची छापील प्रत घेण्यासाठी रांगेत उभे राहून मौल्यवान वेळ खर्ची घालणाऱ्या मुंबईकरांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. रेल्वेने सुरू केलेल्या मोबाइल तिकीट प्रणालीचा पुढील भाग म्हणजेच कोणत्याही छापील तिकिटाशिवाय प्रवास, ही संकल्पना पश्चिम रेल्वेवर लवकरच प्रत्यक्षात अवतरणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी मोबाइल तिकीट प्रणालीमार्फत तिकीट काढल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर तिकीट प्राप्त होईल. या तिकिटाच्या आधारेच ते प्रवास करू शकतील. सेंटर फॉर रेल्वे इन्फम्रेशन (सीआरआयएस) ही प्रणाली विकसित करणार आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईतच मोबाइल तिकीट प्रणालीचा शुभारंभ केला होता. मात्र मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावर मोबाइल तिकीट प्रणालीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्या, तरी त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाइलवरून काढलेल्या तिकिटाची छापील प्रत रांगेत उभे राहून घ्यावी लागत होती. यामुळे प्रवाशांनी मोबाइल तिकीट प्रणालीकडे पाठ फिरवली होती.
मात्र हा मोठा अडथळा दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने गेल्या महिन्यात चेन्नई येथे एका छोटय़ा उपनगरीय भागात पेपरलेस मोबाइल तिकीट पद्धत राबवून पाहिली. तेथे आलेल्या अनुभवानंतर या प्रणालीत काहीशी सुधारणा करून रेल्वेने ही प्रणाली आता पश्चिम रेल्वेवर लागू करण्याचे ठरवले आहे.
प्रवाशांनी प्रवास सुरू करण्याआधीच तिकीट काढले आहे किंवा प्रवासादरम्यान तिकीट काढलेले नाही, हे समजण्यासाठी या नव्या प्रणालीनुसार प्रवासी रेल्वे स्थानकाच्या १५ मीटर लांब असतील, तेव्हाच त्यांना तिकीट काढता येईल. यासाठी ‘सीआरआयएस’ने जीओ मॅपिंग प्रणालीचा अवलंब केला आहे. प्रवासी रेल्वे स्थानक अथवा रेल्वे परिसरात आल्यावर ही प्रणाली काम करणार नाही.
याबाबत पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना यातील काही अडचणी सांगितल्या. मोबाइल तिकीट काढताना प्रवाशांच्या मोबाइलवरील इंटरनेट विनाअडथळा कार्यरत असण्याची गरज आहे. त्यासाठी प्रवाशांना मोकळ्या आकाशाखाली अथवा उत्तम सिग्नल असलेल्या ठिकाणी येऊन तिकीट काढावे लागेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर लांब असलेल्या प्रवाशांनाही या प्रणालीवरून तिकीट काढता येणार नाही. हे तिकीट काढल्यानंतर नियमानुसार एका तासाच्या आत प्रवास सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाच किलोमीटरपेक्षा लांब असलेल्या प्रवाशांना तिकीट काढता येणार नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ही प्रणाली लवकरच पश्चिम रेल्वेच्या सेवेत येईल, असे त्याने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 2:18 am

Web Title: paperless mobile tickets soon on western railway
Next Stories
1 पुणे लाचखोरीत अव्वल; तर मुंबई सगळ्यात मागे
2 वसई-विरार महानगरपालिका निवडणूक : वसई, विरारमध्ये गुजराती टक्का वाढला
3 डास प्रतिबंधात्मक उपायांबाबत टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई आयुक्तांचा इशारा
Just Now!
X