केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे  उभारण्यात येणाऱ्या शासकीय महाविद्यालयाच्या पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी क्षयरोग विभागाच्या जागेची निवड केलेली असताना त्याच जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची (एम्स) निर्मिती करण्याचा प्रस्ताव असून तशी घोषणा नुकतीच करण्यात आली. या शिवाय कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा प्रस्ताव असून त्यासाठी या जागेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेचा उपयोग नेमका कशासाठी करण्यात येणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  
दोन वर्षांपूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना औरंगाबादला जाणाऱ्या पॅरामेडिकल अभ्यासक्रम केंद्रासाठी नागपूरची निवड करण्यात आली. या केंद्रासाठी मेडिकलच्या क्षयरोग विभाग परिसराच्या जागेची निवड करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. मंगला कोहली यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. एन.आंभोरे, मुख्य आर्किटेक्ट मुकेश बाजपेयी, एच एल एल कंपनीचे प्रतिनिधी अनुराग सालवान जागेचे निरीक्षण करण्यासाठी आले होते. या समितीने केंद्र सरकारकडे अहवाल दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात या विषयाकडे वैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे हा प्रस्ताव केवळ कागदावर राहिला. केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सहा महिन्यात या केंद्राचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन डॉ. कोहली यांनी दिले होते. मात्र, दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुका आल्या. केंद्रात सरकार बदलले आणि पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या केंद्राचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला. पॅरामेडिकलचा ८० कोटींचा प्रकल्प होता. त्यातील ८५ टक्के वाटा केंद्र सरकार आणि १५ टक्के वाटा राज्य सरकारचा होता. जागेचे निरीक्षण केल्यानंतर सहा महिन्यात केंद्राच्या बांधकामास प्रारंभ करण्यात येऊन दोन ते तीन वर्षांत पूर्ण होईल असे आश्वासन डॉ. कोहली यांनी दिले होते. मात्र, दीड वर्षांचा कालावधी होऊ गेला तरी पॅरामेडिकल अभ्यासक्रम केंद्राचा प्रस्ताव केवळ कागदावरच आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना पॅरामेडिकल घोषणा होऊन त्याची अंमलबजावणी होत नाही तोच केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर अर्थसंकल्पात विदर्भात ‘एम्स’ची घोषणा करण्यात आली. त्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असताना नुकतीच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात बैठक घेऊन टी बी वॉर्ड परिसराच्या जागेवर एम्सची निर्मिती करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
याशिवाय कॅन्सर इन्स्टिटय़ूटची निर्मिती नागपुरात करण्यात येणार असून त्यासाठीही क्षयरोग विभागाच्या जागेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेचा उपयोग नेमका एम्स, पॅरामेडिकल की कॅन्सर इन्स्टिटय़ूटसाठी करणार आहे? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेडाऊ म्हणाले, पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या केंद्रासंदर्भात जागेचे निरीक्षण करून गेल्यानंतर पुढे काय झाले, ते कळले नाही. मेडिकल प्रशासनाने त्या संदर्भात पाठपुरावा केला होता. मात्र, शासनाच्या वैद्यकीय विभागाकडून काहीच सकारात्मक पाऊले उचलली गेली नाही. ‘एम्स’साठी त्याच जागेची निवड केली आहे, त्यामुळे काहीच कळत नसल्याचे डॉ. हेडाऊ म्हणाले.