News Flash

परभणी जिल्ह्य़ात ज्वारीचे पीक आले भरात..

मराठवाडय़ातल्या अनेक जिल्ह्य़ात दुष्काळाची छाया असताना आणि चारा-पाण्याविना हवालदिल होण्याची परिस्थिती असताना जिल्ह्य़ात ज्वारीचे पीक चांगलेच भरात आले आहे. दुष्काळात माणसांना जगविणाऱ्या या कणसांचे जिल्ह्य़ात

| January 15, 2013 01:09 am

मराठवाडय़ातल्या अनेक जिल्ह्य़ात दुष्काळाची छाया असताना आणि चारा-पाण्याविना हवालदिल होण्याची परिस्थिती असताना जिल्ह्य़ात ज्वारीचे पीक चांगलेच भरात आले आहे. दुष्काळात माणसांना जगविणाऱ्या या कणसांचे जिल्ह्य़ात तरी आशादायी चित्र दिसू लागले आहे. भीषण दुष्काळाच्या झळांनी मराठवाडा होरपळत असताना टपोऱ्या आणि दाणेदार ज्वारीच्या कणसांचे ‘शुभवर्तमान’ शेतक ऱ्यांसाठी आश्वासक ठरण्याची चिन्हे आहेत.
परभणी जिल्हा हा ज्वारीचे कोठार मानला जातो. जिल्ह्य़ातली पांढरीशुभ्र ज्वारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बार्शी-सोलापूर भागातल्या ज्वारीची जशी ख्याती तशीच परभणी जिल्ह्य़ातल्या ज्वारीचीही चव सर्वदूर लोकप्रिय झालेली. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असताना परभणी जिल्ह्य़ात ज्वारीचे पीक मात्र जोमात आले आहे. यंदा जिल्ह्य़ात ज्वारीचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा आहे. केवळ अन्नधान्याचाच नव्हे तर गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न काही अंशी या पिकाने सोडवला जाईल.
गेल्या काही वर्षांत कापसाकडे असलेला शेतक ऱ्यांचा कल लक्षात घेता ज्वारीचे क्षेत्र कमीच झाले होते. कोरडवाहू शेतकरी मूग, उडीद, सोयाबीन या पिकानंतर ज्वारी पेरतात. कोरडवाहू शेतक ऱ्यांना ही दोन्ही पिके दिलासा देणारीच आहेत. कापसावर होत असलेला वारेमाप खर्च आणि बाजारभावात कापसाची होत असलेली घसरण यामुळे यंदा काही प्रमाणात ज्वारीचा पेरा वाढला. गेल्या वर्षी ज्वारीचे भाव प्रचंड वाढले होते. गव्हाला मागे टाकत ज्वारीने आपले ‘दाणेदार’पण सिद्ध केले होते. ज्यांनी कडबा विकला त्यांना चांगले पैसे आले. ज्वारी आणि कडबा असा दुहेरी फायदा या पिकाने शेतक ऱ्यांना दिला. साहजिकच यंदा ज्वारीचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढला. हवा तेव्हा पडणारा पाऊस आणि योग्य वेळी वाढलेली थंडी यामुळे ज्वारीची कणसे आता भरात आली आहेत. सर्व शिवारात पोटऱ्यात आलेली ज्वारी लहरताना दिसत आहे.
दगडी, माळदांडी, टाकळी, मंठी, शाळू असे ज्वारीचे काही  प्रकार. यातल्या प्रत्येक ज्वारीची खासीयत वेगळी आहे. शिवाय हुरडय़ासाठी ‘रावसाहेब, गूळभेंडी’ यांसारख्या ज्वारीच्या काही जाती आहेत. ज्वारीच्या पिकात अशी खास हुरडय़ासाठी राखलेली काही कणसे असतात. अद्याप हुरडा खाण्यासाठी आला नसला, तरीही यंदा ज्वारीचा हंगाम चांगला राहील, असे संकेत शिवारात मिळत आहेत. गेल्या २० वर्षांत संकरित ज्वारीचे बियाणे मोठय़ा प्रमाणात पेरले गेले. त्यामुळे रब्बी ज्वारीवरील ताण बराच कमी झाला. संकरीत ज्वारीने उत्पादन वाढले तरीही ज्वारीच्या जुन्या जाती अजूनही टीकून आहेत. संकरित ज्वारीचे उत्पादन भरघोस असले तरीही खाण्यासाठी मात्र ही ज्वारी कसदार मानली जात नाही. खाण्यासाठी रब्बी म्हणजेच ‘मोठी ज्वारी’लाच जास्त पसंती दिली जाते. संकरित ज्वारीचा भावही कमी असतो. जेव्हा रब्बी ज्वारीचे क्षेत्र अधिक होते तेव्हा संकरित ज्वारी ही सालगडय़ांना ‘चंदी’च्या स्वरूपात दिली जात असे. धान्याच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या मजुरीला ‘चंदी’ असा शब्दप्रयोग आहे. पुढे ही संकरित ज्वारीही ‘चंदी’ म्हणून घेणे बंद झाले. संकरित ज्वारीतही नवनव्या जाती आल्या. लाल गोंडर असलेल्या सुरुवातीच्या संकरीत ज्वारीला पुढे पांढऱ्याशुभ्र संकरित ज्वारीचाच पर्याय आला. या ज्वारीचे सुद्धा पीठ काळपट असायचे. संकरित ज्वारी नवनव्या रुपात येत राहिली. रब्बी ज्वारीचा तोरा मात्र कायमच राहिला. आता अलीकडे रब्बी ज्वारीच्या तोडीस तोड पांढरीशुभ्र आणि दाणेदार अशी ज्वारी कर्नाटकातून येत आहे.
पूर्वी खाद्यसंस्कृतीत गव्हाला जी प्रतिष्ठा होती तीही आता राहिलेली नाही. ‘भाकरी’ ही तशी सर्वसामान्यांचेच अन्न होती. आता भाकरीची चव बडय़ाबडय़ांनीही आपलीशी केली आहे. यातूनच ज्वारीची मागणी वाढत आहे. यंदा कापूस उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला भाव मिळाला नाही. या वर्षीचा अनुभव लक्षात घेता पुढच्या वर्षी शेतकरी भविष्यात पुन्हा ज्वारीकडेच वळण्याची चिन्हे अधिक आहेत. कापसाचा पैसा उशिरा हाती येतो, त्या मानाने मूग, उडीद, सोयाबीन ही तीन महिन्याच्याही आतील पिके आहेत. या पिकांचा पैसा लवकर हाती येतो. त्यानंतर या पिकांवर घेतल्या जाणाऱ्या ज्वारीलाही किंमत येते, कडब्याचाही पैसा होतो. शिवाय पिकांच्या फेरपालटाने जमिनीचा पोतही वाढतो. असे फायदे लक्षात आल्यानंतर आता पुन्हा एकदा ज्वारीचा भाव वधारला जाणार आहे. भविष्यात असलेल्या दुष्काळाची चाहूल लक्षात घेता जनावरांच्या कडब्याच्या किमती यंदाच्या उन्हाळ्यात गगनाला भिडलेल्या असतील. अशावेळी ज्वारीच्या कणसांची आणि कडब्याचीही   किंमत माणसांना आणखी उमजेल.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 1:09 am

Web Title: parbhni distrect good crops of jwari this time
Next Stories
1 दुष्काळानिमित्त शिवसेनेची संघटना बांधणी सुरू!
2 वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक ‘लाँग लाईफ’विरुद्ध अखेर गुन्हा दाखल
3 शिक्षण संचालकांची रिक्त पदे भरण्याबाबत दुर्लक्षच
Just Now!
X