दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होताच शहरातील विविध नामांकित शिकवणी वर्गासाठी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची शोधाशोध सुरू झाली आहे. शहरातील नामांकित शिकवणी वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी महाविद्यालयाप्रमाणे शिकवणी वर्गासमोर पालक आणि त्यांचे पाल्य दिसून आले.
अनेक खासगी शिकवणी वर्गांनी तर दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच शहरातील विविध भागात जाहिराती करण्यासाठी मोठमोठे होर्डिग्ज लावले आहे. गुणवत्ता यादीत ९० टक्क्यांवर गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांंची छायाचित्रे जाहिरातीमध्ये प्रकाशित करून शिकवणी वर्गाचा दर्जा किती चांगला आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षण मंडळाने गेल्या पाच वर्षांंपासून गुणवत्ता यादी बंद केल्यामुळे पहिला कोण किंवा दुसरा कोण ही पद्धत बंद झाल्यामुळे आता ९० टक्क्यांवर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांंचेच छायाचित्र जाहिरातीवर झळकलेले दिसतात. ९० टक्क्यांच्यावर गुण असलेले विद्यार्थी आपल्याच शिकवणी वर्गाचे असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न जाहिरातीतून केला जात आहे. काही शिकवणी वर्गांनी महाविद्यालयाप्रमाणे आवेदन पत्र तयार केले आहे. शिकवणी वर्गाचे पॅकेज देताना दोन विषयासाठी सहा महिन्यांचे ५० ते ६० हजार रुपये तयार ठेवण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले.

नियम डावलून व्यवसाय : गेल्या काही वर्षांत खासगी शिकवणी वर्गाचे फुटलेले पेव आणि त्या निमित्ताने शिक्षणाचा होत असलेल्या व्यापारीकरणास आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केले असली तरी शहरातील काही खासगी टय़ुशन क्लासेसच्या संचालकांनी नियम डावलून वर्ग सुरू केले आहे. शाळेत किंवा महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या खासगी शिकवणी वर्गावर बंदी असली तरी अनेक शिक्षकांनी शाळा महाविद्यालयातील नोकरी सोडून शिकवणी वर्गावर लक्ष केंद्रित केले. मध्यंतरीच्या काळात अनुदानित शाळेतील शिक्षकांवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कारवाई केली होती. त्यावेळी काही शिक्षकांना निलंबित सुद्धा करण्यात आले होते. दरम्यान, पुन्हा एकदा शहरातील काही महाविद्यालय व शाळेतील शिक्षकांनी शिकवणी वर्ग सुरू केले. व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकाला विश्वासात घेऊन अनेक शिक्षक शिकवणी वर्ग घेतात. त्यामुळे शाळेत जाऊन शिकविले नाही तरी चालेल या मानसिकतेमध्ये शिक्षक आहे.