News Flash

नियोजनबद्ध शहरातील पार्किंगचा बोजवारा

नियोजनबद्ध नवी मुंबईतील पार्किंगचा अक्षरश: बोजवारा उडाला असून वाढत्या वाहनांसाठी शहरातील रस्ते अपुरे पडू लागल्याने उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या, सिडको व एमआयडीसीतील काही मोकळे भूखंड, उघडय़ा

| January 30, 2013 12:59 pm

नियोजनबद्ध नवी मुंबईतील पार्किंगचा अक्षरश: बोजवारा उडाला असून वाढत्या वाहनांसाठी शहरातील रस्ते अपुरे पडू लागल्याने उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या, सिडको व एमआयडीसीतील काही मोकळे भूखंड, उघडय़ा गटारांना झाकून पार्किंग तयार करणे अशा या समस्येवर उपाययोजना असल्याचे वाहतूक विभागाने तयार केलेल्या अहवालात नमूद केले आहे.
नवी मुंबईतील वाहतूक कोंडी आणि पार्किंग ह्य़ा दोन्ही समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागल्या आहेत. दरडोई उत्पन्न वाढल्याने वाहने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. नवी मुंबईतील माणसी उत्पन्न १३ हजार ५०० रुपये असल्याने प्रत्येक मध्यमवर्गीय घरात एकतरी दुचाकी वाहन आहे. झोपडपट्टी भागही याला अपवाद नाही. दुचाकी वाहनांची संख्या काही घरांत चार ते पाच असल्याचे दिसून येते. नवी मुंबईत एक लाख चारचाकी व दीड लाख दुचाकी वाहनांची नोंदणी झालेली आहे. यातील पाच ते दहा टक्के वाहने येथे नोंदणी केल्यानंतरही उभी राहत नाही, असे दिसून येते. अशा तीन लाख वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचे काम सिडकोने केलेले नाही.
या शहरात इतक्या मोठय़ा प्रमाणात वाहने येतील याचे आडाखे सिडको अधिकाऱ्यांना त्या वेळी मांडता आले नाहीत. त्यामुळे पार्किंगचे नियोजन पूर्णपणे फसले आहे. वाशीतील मर्कन्टाईल बँक परिसर, त्यामागील स्पेअर पार्ट गल्ली, सेक्टर नऊ रस्ता, रेल्वे स्टेशन, काही मॉल्स क्षेत्र भागात पार्किंगची समस्या बिकट होऊ लागली आहे. वाशीसारखी स्थिती ऐरोली सेक्टर पाच ते तीन परिसर, मुलुंड-ऐरोली खाडीपूल, नेरुळमधील रेल्वे स्टेशन भाग, सीबीडी सेक्टर ११ या भागांत आता पार्किंगवरून दररोज तू-तू मैं-मैं सुरू असल्याचे दृश्य आहे. पार्किंगसाठी जागा कमी आणि वाहने जास्त असे विरोधाभासाचे चित्र नवी मुंबईत उभे राहिले आहे. नियोजनबद्ध शहर म्हणून तरी या शहरात या समस्येने डोके वर काढायला नको हवे होते, असे नवी मुंबईकरांना वाटते. प्रत्येक इमारतीच्या बाहेर वाहनांची रांग लागत असल्याचे दिसून येते. इमारतीतील पार्किंग हाऊसफुल्ल झाल्याने ही समस्या आहे. यावर पार्किंग नियोजन केल्याशिवाय विकासकांना इमारत बांधणी परवाना देऊ नये, असे सुचविण्यात आले होते; पण त्याला विरोध झाला. नवी मुंबई पालिका क्षेत्रफळात उभी रािहलेली ही समस्या खारघर, कोमोठे, द्रोणागिरी भागांत दिसून येत नाही. सिडकोने या भागांत तसे नियोजन केलेले आहे. पार्किंगची ही समस्या सोडविण्याची जबाबदारी आता पालिकेवर आली आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने मध्यंतरी सादर केलेल्या एका सादरीकरणाद्वारे या समस्येवर काही उपाय सुचविले आहेत. त्यात उच्च दाबाखालील जमिनी ताब्यात घेणे, उघडे नाले झाकून त्यावर पार्किंगची व्यवस्था करणे, सिडको व एमआयडीसीकडे काही मोकळे भूखंड आहेत ते ट्रक, टेम्पो पार्किंगसाठी मागून घेणे असे उपायुक्त विजय पाटील यांनी तयार केलेल्या अहवालात सुचविले आहे. वाशीतील इनऑर्बिट मॉलसमोरील भूखंडावर सुमारे १०० गाडय़ांचे पार्किंग होऊ शकतात. याचप्रमाणे सेंटर वन मॉल, तुंगा हॉटेलसमोरील, ऐरोलीतील रेल्वे स्टेशनच्या दुतर्फा, नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरही २३० वाहने उभी राहू शकतात, असे या अहवालात सुचविण्यात आले आहे.
अशा प्रकारे सीबीडी, जुईनगर, सानपाडा, तुर्भे नाका या भागांत मोकळ्या भूखंडाची मागणी करण्यात आली आहे. पालिकेने हे भूखंड सिडकोकडे मागितले आहेत, पण सिडकोने त्यावर अद्याप उत्तर दिलेले नाही. शहरातील सर्व जमीन सिडकोची असल्याने ही समस्या सोडविण्यासाठी सर्वस्वी सिडकोवर अवलंबून राहावे लागत आहे. या सर्व पार्किंगमध्ये ठाणे-बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या लाखो वाहनांचा तर विचारच करण्यात आलेला नाही. या वाहनांसाठीही रस्त्याच्या बाजूला पार्किंग जागा तयार करणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:59 pm

Web Title: parking problem in managementfull city
Next Stories
1 कल्याण डोंबिवली खरंच फेरीवालामुक्त होणार?
2 गोव्यात कोकण इतिहास परिषदेचे अधिवेशन
3 ठाण्यात अपुऱ्या वाहनतळांचा वाहतूक कोंडीवर भार
Just Now!
X