News Flash

पार्किंग शुल्क वाढले, सेवांचे काय?

वाहनतळांचे शुल्क चौपट तसेच दिवसा व रात्रीही पाìकगचे शुल्क आकारून वाहनांना शिस्त लावण्याचा व सार्वजनिक जागांचे भाडे वसूल करण्यासाठी पालिकेने सुरुवात केली आहे

| January 13, 2015 07:58 am

वाहनतळांचे शुल्क चौपट तसेच दिवसा व रात्रीही पाìकगचे शुल्क आकारून वाहनांना शिस्त लावण्याचा व सार्वजनिक जागांचे भाडे वसूल करण्यासाठी पालिकेने सुरुवात केली आहे. वाहतुकीऐवजी वाहनांच्या पाìकगने अडवून धरलेले रस्ते यामुळे मोकळे होतील की क्लीन अप मुंबईप्रमाणे या योजनेचे बारा वाजतील, हे काही महिन्यांतच समजेल.

चौपट शुल्क तसेच इमारतीबाहेर गाडय़ा लावण्यासाठीही शुल्क देण्याविरोधात आधीच काहींनी मुठी आवळल्या असल्या तरी फेब्रुवारीपासून सुधारित शुल्काचे धोरण अमलात येत आहे. वाहनतळामध्ये तसेच रस्त्यांवर गाडय़ा उभ्या केल्यास बसत असलेल्या शुल्कामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणुकांपूर्वी हा प्रकल्प राबवू नये, असा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी केला. सुरुवातीला दक्षिण मुंबईतील सर्वात वर्दळीच्या कुलाबा, फोर्ट व चर्चगेट परिसरात प्रायोगिक तत्त्वावर फेब्रुवारीपासून वाहनतळांचे शुल्क चौपटीने वाढणार आहे. त्यानंतर ते संपूर्ण शहरात लागू केले जाईल. पालिकेने केलेल्या विभागानुसार हा परिसर अ वर्गात येत असून पाìकगचे सर्वाधिक दर याच परिसरात आहेत. त्यामुळे कारचालकांकडून टोकाचा रोष व्यक्त होण्याचीही शक्यता आहे.
एकीकडे सार्वजनिक जागा अडवून बसलेल्या वाहनांकडून शुल्क वसूल करणे योग्यच असल्याचा मतप्रवाह आहे. शहरातील जागा व्यापणाऱ्या झोपडपट्टय़ांबाबत लोक विरोधी भूमिका घेतात तर लाखो रुपयांची गाडी खरेदी करणाऱ्या चालकांनीही वाहनांमुळे व्यापलेल्या जागेसाठी बाजारभावाप्रमाणे शुल्क भरण्यास हरकत घेऊ नये, असेही मत व्यक्त होत आहे. मात्र दर वर्षी किमान एक ते दोन लाख वाहने वाढत असलेल्या या शहरातील वाहनतळांसाठी पालिकेने गेल्या दहा वर्षांत काहीही सुधारणा केलेली नाही. बहुमजली पाìकग, वेबबेस पाìकग, सुरक्षा हे मुद्दे अजूनही कागदावरच आहेत. त्याच वेळी सार्वजनिक वाहतुकीत मेट्रोचा अपवाद वगळता लक्षणीय सुधारणा झालेली नाही.

सार्वजनिक जागेचे शुल्क घेतलेच पाहिजे.
वाहनतळाच्या सुधारित शुल्कामध्ये तीन बाबींचा प्रामुख्याने विचार करायला हवा.
सार्वजनिक जागा ही सर्व नागरिकांची आहे. त्याचा वापर करायचा तर शुल्क भरायलाच हवे. जागा अडवणाऱ्या झोपडय़ांना विरोध होतो तर जागा अडवणाऱ्या श्रीमंतांनाही कमी किंमतीत सेवा घेण्याचा अधिकार नाही. घरांच्या जागेप्रमाणे परिसरातील भावही वाढलेले असतात. त्यामुळे दक्षिण मुंबईत अधिक शुल्क भरणे अपरिहार्य आहे. गेल्या दहा वर्षांत घरांच्या किमती वाढल्या तर वाहनतळांचे शुल्कही वाढले पाहिजे.
कोणतेही वाहन घेतले की त्यासाठी तीन ठिकाणी जागा लागतात. घर, कार्यालय व इतर कुठे वाहन नेणार त्या ठिकाणी. त्यामुळे पार्किंगची समस्या तिपटीने वाढते. याचा विचार वाहन विकत घेताना करणे गरजेचे आहे व त्या प्रमाणात शुल्काद्वारे या जागेची किंमत वसूल करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी आणली पाहिजे.
आधी सार्वजनिक वाहतूक सुधारा, मग वाहनतळ शुल्क वाढवा, असे म्हणून चालणार नाही. जोपर्यंत रस्त्यांची जागा वाहनांनी अडवली आहे तोपर्यंत बससेवा सुरळीत होणे शक्य नाही. त्यामुळे अनियमित पाìकगला आळा घालून कारवाई केली तरच सार्वजनिक वाहतुकीला फायदा होईल.
अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

सुरक्षेचे काय
पालिका केवळ वाहनतळाचे शुल्क वाढवत आहे. मात्र एवढे शुल्क भरूनही वाहनांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास प्रशासन तयार नाही. पाìकग केलेल्या वाहनाची चोरी, त्यातील पेट्रोल-डिझेलची चोरी झाल्यास प्रशासन नुकसानभरपाई देणार का, या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवण्यात येणार का, शुल्कवसुली योग्य प्रकारे होत आहे का, याचे नियमन करणार का.. रिक्षाचालक, टेम्पोचालक झोपडपट्टीबाहेर रात्री गाडय़ा उभ्या करतात, त्यांच्याकडून वसुली करणे अयोग्य ठरेल.
-देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेता

बहुमजली पार्किंग रखडलेलेच
जागेची टंचाई लक्षात घेऊन बहुमजली वाहनतळाची सेवा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न गेली पाच वष्रे अपयशीच ठरतो आहे. बोरिवली, पवई, कुर्ला व माटुंगा येथे बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्यातील एकाही ठिकाणी प्रशासनाला यश आले नाही. पवई येथील दोन वाहनतळांसाठी गेल्या वर्षी मे महिन्यात पालिकेने काढलेल्या निविदेला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता पुन्हा निविदा काढण्याची वेळ आली. जर या वेळी निविदेला प्रतिसाद मिळून तातडीने प्रस्ताव मंजूर झाला तरी हे वाहनतळ उभे राहण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. या वाहनतळासाठी तासाला १५ रुपये व दिवसाला १५० रुपयांपर्यंतचे भाडे आकारावे, असा पालिकेचा विचार आहे. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमधून हे प्रकल्प उभे राहणार असून १५ वष्रे सेवावसुली करण्याचा अधिकार संबंधित खासगी कंपनीकडे राहील.

पार्किंग मार्शल
सुमारे तिप्पट वाढलेले शुल्क, वाहनतळाबाहेर उभ्या राहिलेल्या गाडय़ांसाठी दुप्पट शुल्क, दिवसा व रात्रीच्या पाìकगसाठी मासिक पास याबाबत कारचालकांमध्ये नाराजी आहे. हे शुल्क वसूल करणे हीदेखील पालिकेसाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे सफाई मोहिमेसाठी नेमलेल्या क्लीनअप मार्शलप्रमाणे येथेही पाìकग मार्शल नेमण्यात येणार आहेत. मात्र लोकांच्या तक्रारींमुळे मार्शल बदनाम झाल्याने त्यांचे नाव बदलण्यात येईल एवढेच.

सार्वजनिक वाहतूक सुधारली आहे का..
वाहनांची संख्या व पार्क केलेल्या वाहनांमुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊन सर्वानाच फटका बसतो. खासगी वाहनांची संख्या कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी पाìकग शुल्क वाढवत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र या काळात सार्वजनिक वाहतूक किती वाढली, हा वादाचा मुद्दा आहे. मेट्रोमुळे अंधेरी-घाटकोपरमधील रस्त्याची वर्दळ कमी झाली आहे. मात्र मोनो रेल्वेमुळे वडाळा परिसरात कोणताही फरक पडलेला नाही. याउलट दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी वांद्रे-वरळी सी-िलक, पूर्व मुक्त मार्ग असे प्रकल्प राबवण्यात आल्याने खासगी गाडय़ांना प्रोत्साहन मिळाले आहे.

मनमानीप्रमाणे आधीच शुल्क वाढवलेत
मी गेली सात-आठ वष्रे बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहाजवळ पालिकेच्या वाहनतळामध्ये बाईक लावत होतो. त्यासाठी आधी पाच रुपये घेतले जात असत. मात्र त्यानंतर दहा रुपये आणि गेली दोन वष्रे वीस रुपये शुल्क आकारले जाते. एक तास वाहन उभे केले तरी दिवसभराचे शुल्क घेतले जाते. त्यावर कोणाचाही वचक नाही. त्यामुळे पालिकेने आता सुधारित शुल्क आणले असले तरी वाहनतळ चालवण्यासाठी घेणाऱ्यांची मनमानी आधीपासूनच सुरू आहे. त्यामुळे मी गेले दोन महिने बसने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे.
संतोष मसूरकर, बोरिवली
सुरक्षाच नाही.
फोर्ट येथे खादी ग्रामोद्योगसमोर पालिकेच्या वाहनतळावर मी बाईक लावत असे. मात्र मोठय़ा गाडय़ांना जागा करून देण्यासाठी बाईक सरकवून ठेवली जात असे. कधी ती पार्किंग लाइनच्या बाहेर गेली की सरळ वाहतूक पोलीस उचलून नेत. मग दोनशे रुपये देऊन ती सोडवून आणावी लागे. असा तीन-चार वेळा अनुभव आल्यावर मी तेथे गाडी लावणे सोडून दिले. सुरक्षाच देणार नसाल तर केवळ शुल्क वाढवून फायदा नाही.
अनेकदा पावती फाडली जात नाही. कोणाकडून किती शुल्क घ्यायचे त्याचे बंधन नाही. पालिका धोरण आणते पण वाहनतळ खासगी माणसे नियंत्रित करतात. पालिकेच्या धोरणात व अंमलबजावणीत सुसूत्रता नाही आणि शुल्कवसुली करणाऱ्यांवर वचकही नाही.
संजय पटवर्धन, दादर

वेबबेस पार्किंग
गाडी नेमकी किती वेळ पार्क केली होती आणि त्यानुसार आलेले शुल्क याबाबत कारचालक व वाहनतळाचे कर्मचारी यांच्यात खडाजंगी होत असते. त्यामुळे प्रवेश व बाहेर निघतानाची वेळ, वाहन क्रमांक यांची नोंद करून त्यानुसार पावती देणारी हॅण्ड हेल्ड यंत्र आणण्याचा विचार २०११ मध्ये सुरू झाला. त्यानंतर २०१३ मध्ये पालिकेने या प्रकारची ६०० यंत्रखरेदी केली होती. इरॉस, रिगल व त्यानंतर क्रॉफर्ड मार्केटच्या वाहनतळामध्ये हा प्रयोग राबवण्यातही आला. पालिकेची सर्व ९२ वाहनतळ मुख्य सव्‍‌र्हरला जोडून कारचालकांना जागा बुक करण्याची सोय देण्याचा प्रशासनाचा प्रकल्प अजूनही मार्गी लागलेला नाही. आता या वाहनतळांसोबतच इमारतींच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या गाडय़ांबाबतही नवीन धोरण लागू झाल्याने पालिकेची वेबबेस वाहनतळांची योजनाही सुधारावी लागेल.
पालिकेकडील एकूण वाहनतळ    ९२    
अ विभागात    ६२
ब विभाग    २८
क विभाग    २
१०,३१४ वाहनांना पार्किंगसाठी
जागा उपलब्ध
शहरातील वाहनांची संख्या
दुचाकी     – १४ लाख
चारचाकी     – ८ लाख
टॅक्सी     – ५७ हजार
रिक्षा     – १.२८ लाख
एकूण     – २५ लाख
दर वर्षी वाहनांच्या संख्येत सुमारे एक ते दीड लाखांनी वाढ होते.

 

– प्राजक्ता कासले, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 7:58 am

Web Title: parking rate increases
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 ‘सुपरवुमनगिरी’ पडतेय भारी!
2 वाळवणासाठी जागेची टंचाई
3 सर्वात महागडे ‘कुकबुक’
Just Now!
X