25 September 2020

News Flash

पारनेर भूमी अभिलेख कार्यालय वठणीवर

तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट तसेच अनागोंदी कारभाराविरोधात आमदार विजय औटी यांनी मार्च महिन्यात केलेल्या आंदोलनानंतर या कार्यालयातील कर्मचारी सुतासारखे सरळ झाले आहेत.

| June 27, 2013 01:50 am

तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट तसेच अनागोंदी कारभाराविरोधात आमदार विजय औटी यांनी मार्च महिन्यात केलेल्या आंदोलनानंतर या कार्यालयातील कर्मचारी सुतासारखे सरळ झाले आहेत. नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होऊ लागली असून वर्षभरापासून प्रलंबित असलेली तब्बल ४८५ मोजणीची प्रकरणे ऑगस्टअखेर हातावेगळी करण्याचा निर्णय प्रभारी उपअधीक्षक भगवान शिंदे यांनी घेतला आहे.
दरम्यान, औटी यांच्या आंदोलनाची दखल घेउन वरिष्ठ कार्यालयाने तब्बल सहा कर्मचाऱ्यांची पारनेरहून उचलबांगडी केली आहे, मात्र त्यांच्या जागेवर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने अपुऱ्या मनुष्यबळावर अधीक्षक शिंदे यांना कार्यालयाच्या सफाईचे काम हाती घ्यावे लागले आहे.
नगर तालुक्याचे अधीक्षक असलेल्या शिंदे यांच्याकडे पारनेरच्या अतिरिक्त पदभाराबरोबरच नगर भूमापन अधिकारीपदाचाही पदभार आहे. तीन पदभार सांभाळताना शिंदे यांना चांगलीच कसरत करावी लागत असली तरी हे आव्हान स्वीकारून येत्या दोन महिन्यांत या कार्यालयाचा कारभार सुरळीत करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. प्रलंबित प्रकरणे मार्गी लावल्यानंतर या कार्यालयाची एकही तक्रार राहणार नाही असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला
मोजणीसाठी देण्यात आलेली तब्बल १४१ प्रकरणे कर्मचाऱ्यांनी कार्यालयात जमाच केली नसल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रभारी अधीक्षक शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना ही प्रकरणे तातडीने कार्यालयात जमा करण्याचे आदेश आले असून त्यात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. यापैकी काही कर्मचारी या कार्यालयातून बदलून गेले असून त्यांच्या सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 1:50 am

Web Title: parner land record office bring down
टॅग Parner
Next Stories
1 जिल्ह्य़ासाठी ७ हजार कोटींचा पतपुरवठा
2 गुन्हेगाराच्या शुभेच्छा फलकांमुळे पोलिसांचे पितळ उघडे
3 कृषी आराखडय़ासाठी कृषिमंत्री आग्रही
Just Now!
X