चिंचोली घाटात चालकास मारहाण करून चोरून नेलेली इनोव्हा कार आरोपींसह ताब्यात घेण्याची कामगिरी पारनेर पोलिसांनी केली आह़े  याच घाटात काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या नगरचे प्रसिद्घ व्यापारी शरद मुथा यांच्या रक्ताळलेल्या इनोव्हा कारचे रहस्य मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
पारनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २५ मार्च रोजी पुणे येथील अज्ञात इसमांनी पुण्याच्याच साक्षी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीची इनोव्हा मोटार भाडय़ाने घेतली होती. या ग्राहकांच्या सुचनेनुसार भिटे यांनी इनोव्हा (क्रमांक- एमएच १२ एफपी ९५४२) नवी सांगवी येथे पाठविली. पुण्याहून तिघेजण शिर्डी-शनी शिंगणापूरचे दर्शन घेऊन पुण्याकडे परतत असताना तिघांपैकी एकाने धान्य घेण्याच्या नावाखाली मोटार पारनेरच्या दिशेने घेण्यास भाग पाडले. पारनेर ओलांडल्यानंतर अळकुटी रस्त्यावर चिंचोली घाटात इनोव्हा थांबविण्यात आली. तिघांनी चालक लक्ष्मण दत्तात्रय सातपुते (रा. हवेली, जि. पुणे) यास मारहाण करून कारबाहेर काढून दिले, तेथून इनोव्हा घेऊन तिघेही आरोपी पसार झाले.
चालक सातपुते याने पारनेर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल शिवरकर व उपनिरीक्षक विकास सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. शिंगणापूर देवस्थानच्या फुटेजमध्ये तिन्ही आरोपी कैद झाल्याने तेथेच त्यांचा शोध लागला. त्या तिघांचेही छायाचित्रे ताब्यात घेऊन पोलीस पथक पारनेरला परतले. आरोपींची छायाचित्रे हाती लागल्याने पोलिसांनी लोणी (जि. पुणे) येथून सुभाष विठठल फुलमाळी व सचिन शिवाजी पडवळ यांना ताब्यात घेतले, त्यांचा तिसरा साथीदार सचिन नंदू दाभाडे यास सुतारवाडी (पाषाण, पुणे) येथे जेरबंद करण्यात आले.
आरोपींनी ही मोटार राजस्थानात विकली होती. पोलिसांनी तेथून ही इनोव्हा कार हस्तगत केली आहे. घटनेनंतर तीन आठवडयात आरोपींसह मुद्देमाल हाती लागलेला असताना याच घाटात काही महिन्यांपूर्वी आढळून आलेल्या नगरचे बडे बांधकाम व्यावसायिक शरद मुथा यांच्या रक्ताळलेल्या इनोव्हा कारचे गुढ मात्र आजूनही कायम आहे. त्याची चर्चा पुन्हा तालुक्यात सुरू झाली.