अपर्णा रामतीर्थकर, अ‍ॅड. अविनाश भिडे, डॉ. दिनकर केळकर, प्रकाश भुटार यांना येथील शंकराचार्य न्यासातील कुर्तकोटी सभागृहात परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी समितीतर्फे सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान आणि समितीचे आधारस्तंभ म्हणून शहरातील सर्व ब्राह्मण संस्थांचा सन्मान करण्यात आला. या वर्षांपासून भगवान परशुराम जयंती निमित्ताने समितीने चार पुरस्कारांचे प्रकाशन केले आहे.
‘सावरकर परशुभूषण पुरस्कार’ अपर्णा रामतीर्थकर यांना देण्यात आला. समाज घडविणे तसेच आपली कुटुंब व्यवस्था टिकावी यासाठी केलेल्या कार्याबद्दल रामतीर्थकर यांना सन्मानित करण्यात आले. ‘न्यायमूर्ती रानडे विधीज्ञ पुरस्कार’ न्याय क्षेत्रात उत्तम सेवा केल्याबद्दल अ‍ॅड. अविनाश भिडे यांना देण्यात आला. ‘महर्षी सुश्रृत वैद्यक’ पुरस्काराने डॉ. दिनकर केळकर यांना सन्मानित करण्यात आले. डॉ. केळकर १९०७ पासून व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सेवाव्रती म्हणून रुग्णसेवा करत आहेत. ‘महर्षी भृगु ज्योतिष’ पुरस्काराने प्रकाश भुटार यांचा गौरव करण्यात आला. मागील ३४ वर्षांपासून ते ज्योतिष विषयात उत्तरोत्तर प्रगती करत आहेतर्. ओमप्रकाश शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार समितीत सूर्यकांत रहाळकर यांनी मोठी जबाबदारी पार पाडली
परशुराम जयंतीच्या माध्यमातून त्यांना मानणाऱ्यांचे एकत्रीकरण करणे हा परशुराम जयंती उत्सव समितीचा प्रमुख हेतू आहे. त्यानुसार नाशिक व परिसरातील साधारण ५० हजार लोकांचे एकत्रीकरण या माध्यमातून मागील दोन वर्षांत झाले आहे.
या कार्यक्रमानंतर भगवान परशुरामांची शोभायात्रा भद्रकाली मंदिरापासून काढण्यात आली.
     शोभायात्रेचा समारोप रात्री १० वाजता श्री काळाराम मंदिरात झाला. यावेळी सर्व ब्राह्मण संस्थांचे पदधिकारी समीर शेटे, नीलेश कुलकर्णी, सतीश शुक्ल आदी उपस्थित होते.