राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धाकरिता निवडल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या चमूमध्ये सतत एकाच महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने असल्याने इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला डावलले जात असल्याची भावना आहे.
मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धामध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी १५ विद्यार्थ्यांचा चमू निवडला जातो. गेल्या वर्षी विद्यापीठाकरिता म्हणून निवडल्या गेलेल्या चमूमध्ये १५ पैकी ८ विद्यार्थी हे वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयाचे होते. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित तब्बल ६५० महाविद्यालये आहेत. परंतु, १५ जणांच्या चमूमध्ये आठ विद्यार्थी एकाच महाविद्यालयाचे निवडले जात आहेत.
इतकेच नव्हे तर स्पर्धेदरम्यान मैदानावर प्रत्यक्ष खेळवल्या जाणाऱ्या ११ जणांमध्येही हे आठ खेळाडू आवर्जून खेळवले जातात. मैदानावरील ११ जणांच्या टीममध्ये केवळ तीन विद्यार्थी इतर महाविद्यालयांचे असतात. हा पक्षपात गेल्या वर्षी तर इतक्या टोकाला गेला होता की विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धामध्ये सात शतके झळकावणाऱ्या गुणी खेळाडूलाही मैदानाबाहेर बसविण्यात आले होते.
या पक्षपाताचा परिणाम विद्यापीठाच्या कामगिरीवरही होतो आहे. पोषक वातावरण, पायाभूत सुविधा, दर्जेदार प्रशिक्षक यामुळे मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. पण, खेळाडूंच्या निवडीतील पक्षपातामुळे विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
विद्यापीठाच्या क्रिकेट टीमच्या निवडीवरून धूसफूस अनेक दिवसांपासून होतीच. पण, या पक्षपाताच्या पाश्र्वभूमीवर ती ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणे बाहेर पडण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या क्रीडा समितीवर असलेल्या अधिसभा सदस्यांनीच आता या पक्षपाताला वाचा फोडण्याचे ठरवले आहे.
‘राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धामध्ये आपले कौशल्य दाखविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. परंतु, एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोठी संधी दिली जात असेल तर तो इतर गुणी विद्यार्थ्यांवर अन्याय ठरतो. त्यामुळे, एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राध्यान्य देण्यापेक्षा इतर महाविद्यालयातील गुणवान विद्यार्थ्यांनाही निवडले जावे,’ अशी मागणी विद्यापीठाच्या क्रिकेटविषयक क्रिडा समितीचे सदस्य आणि युवा सेनेतर्फे अधिसभेवर निवडून आलेले सदस्य राजन कोळंबेकर यांनी केली.
एमसीआयचा वरचष्मा नको!
विद्यापीठाच्या क्रिकेट चमूच्या निवडीवर ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’चा वरचष्मा आहे. त्यामुळेच सतत एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चमूमध्ये वरचष्मा असतो अशी चर्चा आहे. विद्यापीठाच्या चमूला एमसीआय मोठी आर्थिक मदत पुरविते. मात्र, याच्या बदल्यात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्णी विद्यापीठाच्या चमूत लावली जात असेल, तर ते चुकीचे आहे, अशी भावना विद्यापीठ वर्तुळात व्यक्त होते आहे.