निवडणूक प्रचाराच्या काळात पोलिसांनी मोठय़ा प्रमाणावर छापे घातले. या छाप्यांत त्यांना भरपूर ‘माल’ही सापडला. पण याचे कारण त्यांना अशा मालाच्या टिप्स दिल्या जात होत्या. पैशांचे वाटप होणार आहे, भेटवस्तूंचा साठा करण्यात आला आहे, अपप्रचाराची प्रसिद्धी पत्रके वाटली जाणार आहेत अशा प्रकारच्या या टिप्स मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. अशा टिप्स पोलिसांना मोठय़ा प्रमाणावर मिळाल्या याचे कारण आहे युती आणि आघाडी तुटल्याचे. पूर्वी हे पक्ष एकत्र होते आणि आता वेगळे झाल्याने तेच प्रतिस्पध्र्याच्या विरोधात पोलिसांना माहिती देत आहे. मुंबईत सुमारे दोन कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्याशिवाय मद्यवाटप, पैसेवाटप, भेटवस्तूंचा साठा घरात दडवून ठेवणे आदींबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. प्रतिस्पर्धी पक्षातील कार्यकर्तेच प्रमुख खबरी बनल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
सेना -भाजप आणि काँगेस -राष्ट्रवादी आजवर एकत्र होते. त्यामुळे त्यांना परस्परांची कार्यपद्धती माहिती आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या वेळी त्यांच्या गैरप्रकारांची माहिती असल्याने ते पोलिसांना, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला माहिती देत होते. यामुळेच ही संख्या वाढली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मद्य आणण्याचे चोरटे मार्ग, ते ठेवण्याची जागा, पैशांचा स्त्रोत, वाटपाचे मार्ग, कुठल्या भागावर पकड आहे, तेथील मतदारांना कसे आकर्षित केले जाते या सर्व बाबी माहित असल्याने प्रतिस्पर्धी पोलिसांना माहिती देऊन त्याच्या योजना उधळून त्यांना अडचणीत आणत आहेत. याशिवाय राजकीय व्यूहरचना कशी करतात, त्याचे डाव काय असू शकतात हे सुद्धा समजल्याने ते एकमेकांची कोंडी करत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची पंचाईत झालेली दिसून आली. काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी गळ्यात गळे घालणारे आता एकमेकांचा गळा धरू लागल्याचे चित्र दिसत आहे.