भाजप-शिवसेना युतीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या वाटाघाटी आणि आरोप प्रत्यारोपामुळे राज्यातील गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटण्याच्या मार्गावर असताना विदर्भातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते व नेते अस्वस्थ झाले आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत आमची भावना कळवा, अशी विनंती केली जात आहे.
नागपूर जिल्हा परिषदेवर भाजप, शिवसेना, आरपीआय, बसपा आणि गोंगापा यांनी एकत्र येऊन वर्चस्व निर्माण केले. विजयाचा जल्लोष साजरा करीत असताना दुसरीकडे मात्र राज्यात महायुती तुटण्याचे संकेत दिले जात असल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. राज्यातील भाजप-शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी नागपूर जिल्हा परिषदेसारखी भूमिका स्वीकारत महायुती करावी आणि विधानसभा निवडणूक लढवावी, अशी भावना व्यक्त केली. गेल्या दहा दिवसांपासून जागा वाटपाबाबत शिवसेना-भाजपमध्ये कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे शहर, जिल्ह्य़ातील कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एक एक पाऊल समोर टाकून मार्ग काढावा आणि युती कायम ठेवावी, अशी इच्छा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात भाजप-शिवसेनच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आला.
शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे म्हणाले, नागपूर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही समन्वयातून एकत्र येऊ शकतो तर राज्यात का नाही. गेल्या २५ वर्षांची युती तुटू नये अशी आमची इच्छा आहे. मात्र, निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील. युती तुटली एका विचाराने काम करणारा कार्यकर्ता विभागला जाणार हे निश्चित आहे.
आमदार आशिष जयस्वाल म्हणाले, भाजप-शिवसेना एक कुटुंब असून त्या कुटुंबातील आम्ही सर्व सदस्य आहोत. एका कुटुंबाचे दोन कुटुंब झाल्यावर जे दुख होते ते तेच आम्हाला होईल. विदर्भात भाजप-शिवसेना कार्यकर्ता आतापर्यंत निवडणुकीत एकत्रपणे काम करीत असल्यामुळे युती तुटली तर त्याचा परिणाम कार्यकत्यार्ंवर होईल. आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेसोबत गेल्या २५ वषार्ंपासून युती असल्यामुळे जिल्ह्य़ातील राजकारण असो की कुठलीही निवडणूक असो, एकत्र येऊन आम्ही निर्णय घेत असतो त्यामुळे युती कायम राहावी आणि राज्यातील भाजप-शिवसेना नेतृत्वाने जागावाटपाबाबत समन्वयाची भूमिका घेत निर्णय घ्यावा आणि निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याची गरज आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे म्हणाले, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने भाषण केले त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. जागा वाटपाचा निर्णय हा समन्वयातून किंवा बैठकीतून सोडवता येऊ शकतो. मात्र, कार्यकत्यार्ंच्या मेळाव्यातून ठराविकच जागा भाजपला मिळतील, असे विधान करून त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दुखवले आहे. महायुती कायम राहावी, अशी आमची इच्छा आणि तसा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांनी समजुतीची भूमिका घ्यावी जेणे करून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दुखावले जाणार नाही.