‘असून अडचण नसून खोळंबा’ असलेल्या सीव्हीएम मशीन्स बंद करण्याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याने ही कुपन्स घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. २०१३ मध्ये ही कुपन्स बंद करण्याचा निर्णय जाहीर होत असतानाच पश्चिम रेल्वेवर आणखी १५० नवी मशीन्स लावण्यात येत आहेत.  तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध तिकीट वितरण यंत्रणेचा वापर करत आहे. सीव्हीएम कुपन्स पद्धती सुरू करून साधारण १८ ते २० वर्षे झाली आहेत. ही पद्धती सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मात्र तरीही तिचा उपयोग मुंबईच्या उपनगरी रेल्वेने प्रवास करणारे लाखो प्रवासी दररोज करत आहेत. एका पाहणीनुसार, मध्य रेल्वेवर दररोज सुमारे अडीच ते पावणे तीन लाख प्रवासी तर पश्चिम रेल्वेवर दोन ते सव्वादोन लाख प्रवासी या कुपन्सचा वापर करून प्रवास करतात. कुपन्स व्हॅलिडेट करून देणारी मशीन्स सतत नादुरूस्त होत असल्याने प्रथम ही मशीन्स पुरविणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करून दुसऱ्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. मात्र मशीन्स नादुरूस्त होण्याचे प्रमाण कायम राहिले. रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम (अ‍ॅटोमॅटिक तिकीट व्हॅलिडेटींग मशीन्स) यंत्रणेला प्राधान्य देण्यासाठी सीव्हीएम मशीन्स बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही कोटी रुपयांची कुपन्स रद्दबादल होणार होती. अखेर आणखी काही काळ ती कुपन्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१३ मध्ये ही कुपन्स बंद करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने सीव्हीएम ऐवजी एटीव्हीएम आणि जेटीबीएस (जनसाधारण तिकीट बुकींग सेवा) यंत्रणेला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी एटीव्हीएम मशीन्स प्रत्येक स्थानकावर लावण्याबरोबरच अनेक स्थानकांबाहेर जेटीबीएस केंद्र वाढविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेने मात्र सीव्हीएम मशीन्स वाढविण्यास सुरुवात केली असून ही कुपन्स चालूच राहतील असे निर्देश दिले आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवरील १९ टक्के प्रवासी दररोज या कुपन्सचा वापर करीत आहेत. मध्य रेल्वेने ही कुपन्स बंद केली तरी तिचा वापर तिकीट म्हणून केला तर ते मध्य रेल्वेवर अधिकृत तिकीट ठरणार का हे अद्याप निश्चित झालेले नाही.