उपचाराच्या वेळी रुग्णाची संमती घेण्यात आली का, त्याच्याकडून जास्त पैसे उकळले गेले का, रुग्णाने उपचार झाल्यानंतर आपणाला हे करायचेच नव्हते, अशी भूमिका घेतली का.. असे अनेक प्रश्न आणि मग नेमके खरे कोण- रुग्ण की रुग्णालय? असा पेच निर्माण करणारे प्रकरण नुकतेच चिंचवडमध्ये घडले. या प्रकरणात रुग्णालय आहे- आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालय आणि रुग्ण आहेत- काँग्रेसच्या शहर पर्यावरण विभागाचे अध्यक्ष तेजिंदरसिंह अहलुवालिया!
दोन्ही बाजूंनी पत्रकार परिषद घेऊन आपापली बाजू मांडली. अहलुवालिया यांच्या वतीने सिकंदर काटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘अहलुवालिया ४ जानेवारीला मुंबईहून पुण्याला येत होते. त्यांना चिंचवडजवळ अस्वस्थ वाटू लागले. ते उपचारांसाठी आदित्य बिर्ला रुग्णालयात गेले. त्यांना दाखल करून घेऊन काही चाचण्या घेतल्या गेल्या. सर्व चाचण्यांचे अहवाल सामान्य होते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी अहलुवालिया यांना बरे वाटू लागले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करून घेण्याचा सल्ला दिला. कोणतीही शंका नको म्हणून अहलुवालिया त्याला मान्यता दिली. अँजिओग्राफी करताना ती त्यांना पाहता येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अहलुवालिया यांना दिलेल्या इंजेक्शनमुळे त्यांची शुद्ध हरपली. ही तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की अहलुवालिया यांची तातडीने अँजिओप्लास्टी करावी लागेल. त्या वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टरांनी अहलुवालिया यांची स्थिती गंभीर असल्याचे सांगत पत्नीची परवानगी मिळवली व अँजिओप्लास्टी उरकली. रुग्णालयाने त्याचे बिल ४ लाख ७० हजार रुपये बिल लावले. अहलावालिया यांनी ते भरण्यास नकार दिला. रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकाने त्यांना मारहाण केली. हे बिल अवाजवी असून, या शस्त्रक्रियेसाठी दोन ते अडीच लाखांहून अधिक थर्च येत नसल्याचे कळते.’
रुग्णालयाने अहलुवालिया यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी सांगितले, ‘अहलुवालिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळेच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या पत्नीने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांना रुग्णाच्या गंभीर स्थितीची कल्पना देऊन स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यास सांगितले होते. मगच त्यांच्या पत्नीकडून अँजिओप्लास्टीसाठी संमती घेतली होती. ८ जानेवारीला अहलुवालिया यांना रुग्णालयातून घरी जायची अनुमती देऊन बिल देण्यात आले. या वेळी अहलुवालिया यांनी २५ जणांसह गोंधळ सुरू केला. त्यांनी बिल न देताच धमकावत पळ काढला. त्यांचे वाहन अडविण्याच्या प्रयत्नात एक सुरक्षारक्षक जखमी झाला.’
या प्रकरणी दोघांकडूनही एकमेकांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे, असे हिंजवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश देवरे यांनी सांगितले.