दीड वर्षांच्या आपल्या पुतण्याचे अपहरण करून त्याला पुण्यातील एका बांधकाम ठेकेदाराला २५ हजारांस विकल्याची घटना उघड झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी चुलत्याला अटक करण्यात आली असून पुण्यातून अपहृत बालकाची सुटका करण्यात आली आहे.
बोरामणी येथे राहणारे बाशा मलिक नदाफ (वय २७) यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसह सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात येऊन आपला दीड वर्षांचा मुलगा अमजद हा हरविल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास हाती घेतला असता हरविलेला मुलगा अमजद हा त्यांचा चुलता युन्नूस नदाफ (वय २१) याच्याकडे असताना काही व्यक्तींनी पाहिले होते. तसेच त्यावेळी युन्नूस हा दारूच्या नशेत होता, अशी माहिती मिळाली. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी युन्नूस यास ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या बसताच त्याने आपल्या पुतण्याच्या अपहरणाची व त्याला पुण्यात विकल्याची कबुली दिली. त्याने आपला मित्र बाळू भीमाशंकर वाघमारे (वय २२, रा. बोरामणी) याच्या मदतीने अमजद यास पुण्यात नेले. पुण्यातील बांधकाम कंत्राटदार अभय देवताळे यास २५ हजारांस विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी युन्नूस नदाफ व बाळू वाघमारे यांना अटक करून पुढील तपास केला. पुण्यात जाऊन बांधकाम कंत्राटदार देवताळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून अमजद याची सुटका करण्यात आली. अमजद यास पुण्यातून सोलापुरात आणले व त्यास आई-वडिलांच्या हवाली केले तेव्हा दोघा जन्मदात्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय सोनवणे व सहायक पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून चिमुकल्या अमजदची सुटका केली. युन्नूस नदाफ व बाळू वाघमारे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
अमजदचे वडील बाशा नदाफ याने आपला सख्खा भाऊ युन्नूस याने दारूच्या आहारी जाऊन दुष्कृत्य केल्याचे सांगितले. मात्र तो एवढय़ा खालच्या पातळीपर्यंत जाईल, असे वाटत नव्हते, असे त्याने नमूद केले.