कल्याणमधील पत्रीपुलाजवळ रस्त्यावरील खड्डय़ामध्ये दुचाकी आदळून चालक खाली पडला. त्याच वेळी मागून येणारा भरधाव ट्रक दुचाकी स्वाराच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार जुना पत्रीपूल येथे घडला. कल्याणमधील खड्डय़ांचा हा पहिला बळी ठरला आहे.
कल्याणमधील चिकणघर येथील नाना पाटील चाळीत राहणारे नामदेव मोरे (वय ४२) हे स्कुटीवरून बुधवारी पावणेदोन वाजता शिळफाटय़ाकडून कल्याणच्या दिशेने येत होते. जुना पत्रीपूल येथे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ाचा अंदाज न आल्याने मोरे यांची दुचाकी खड्डय़ात आपटल्याने ते खाली पडले. त्याच वेळी पाठीमागून एक भरधाव वेगाने ट्रक आला. तो ट्रक मोरे यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पळून गेला. नामदेव यांचे भाऊ संजय मोरे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली एमआयडीसीत काही रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. एमआयडीसी आणि आजदे ग्रामपंचायतीच्या वादात हे रस्ते कोण बुजवणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रिक्षा, बसमधून जाणाऱ्या प्रवाशांना या खड्डय़ांचा सर्वाधिक त्रास होत आहे. मुसळधार पावसाने हे खड्डे भरले तर चालकांना सर्वाधिक त्रास होतो. पालिका क्रीडासंकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पावसामुळे तळे साचत असल्याने वाहन चालकांना वाहने न्यायची कशी, असा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काम सुरू आहे. त्यामुळे पालिका अधिकारी बांधकाम विभागाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत.