आजारी पडलेल्या महिलेला भानामतीने पछाडल्याचे निमित्त करून तिच्यावर मांत्रिक उपचार करताना शरीरावर भंडारा लावलेला भाग अचानकपणे पेटल्याने त्यात संबंधित महिला भाजून मृत्युमुखी पडली. परंतु ही आग कशी लागली, याचे गूढ उकलले नाही. सांगोला येथे हा प्रकार घडला. हा अंधश्रध्देचा बळी असल्याचे मानले जात आहे.
सुशीला सुभाष आयवळे (वय ४५, रा. संजयनगर झोपडपट्टी, सांगोला) असे या घटनेत बळी पडलेल्या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. तीन दिवसांपासून ती आजारी पडल्याने व डॉक्टरी इलाज करूनही उपयोग होत नसल्याने सुशीला हिच्या नातेवाईकांनी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील श्याम भानुदास नकाते या मांत्रिकाला बोलावून घेतले. सांगोल्यात काल बुधवारी मृत सुशीला हिच्या घरी मांत्रिकाने उपचार सुरू केले. त्या वेळी तिच्या छातीत दुखू लागले म्हणून मांत्रिकाने तिच्या अंगावर भंडारा चोळला. परंतु भंडारा चोळताच अचानकपणे सुशीला हिच्या छातीसह डाव्या पायाच्या नडगीला आग लागली. यात ती भाजल्याने जखमी झाली. तिला सुरूवातीला पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती गंभीर झाल्याने तिला बेशुध्दावस्थेत सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात हलविले असता काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत झाली आहे.
मांत्रिकाने मृत सुशीला हिच्या शरीराला मांत्रिक उपचारापोटी कोणता भंडारा लावला? भंडारा लावल्यानंतर लगेचच तिच्या छातीला व पायाला आग कशी लागली? भंडाऱ्यात नेमके काय होते, याचे गूढ कायम असून याबाबत संबंधित मांत्रिकाला स्पष्टीकरण देता आले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सुशीला हिच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे.