देहू-आळंदीच्या कुशीत असलेल्या िपपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीत मोठय़ा प्रमाणात प्रदूषण असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार राजीव गांधी प्रतिष्ठानने आयुक्तांकडे केली आहे. अनधिकृत बांधकामांप्रमाणेच आयुक्तांनी नदी स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणीही केली आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदन दिले असून, नद्यांना घाणीच्या साम्राज्यातून सोडवण्याची मागणी केली आहे. सांगवी, पिंपळे गुरव, िपपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, चिंचवड या भागातील जनतेला नदीतील घाणीमुळे दरुगधीचा त्रास जाणवतो. या परिसरात डासांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे लहान मुले व वृद्ध आजारी पडताना दिसत आहेत. आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांप्रमाणेच आरोग्यासाठी विशेष मोहीम राबवावी, त्यासाठी शहराचा विशेषत: नदीलगतच्या भागाचा पाहणी दौरा करावा. नदीत थेटपणे सोडण्यात येत असलेले सांडपाणी त्यांना जागोजागी दिसून येईल. नद्यांमध्ये घाणीचे जबरदस्त साम्राज्य पसरले आहे. आरोग्याचे तसेच पर्यावरणाचे अधिकारी स्वत:च्या फायद्याचे विषय असतील तरच लक्ष देतात, अन्यथा ढुंकूनही पाहात नाहीत.
पवनेच्या दुरवस्थेस महापालिकाच जबाबदार आहे. त्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नवले यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार घ्यावा, असेही
प्रतिष्ठानने म्हटले आहे.