मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सोमवारी (दि. ११) औरंगाबाद येथे येणार आहेत, तर मंगळवारी (दि. १२) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बीड जिल्ह्य़ातील जनावरांच्या छावण्यांपासून दुष्काळी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
या दोन्ही नेत्यांना परिस्थितीचे गांभीर्य आकडेवारीत सांगण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लगबग सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तालयातून टंचाईग्रस्त जिल्ह्य़ांना अद्ययावत माहिती कळविण्यास सांगितली आहे.
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच मराठवाडय़ातील नांदेड व िहगोलीवगळता अन्य सर्व जिल्ह्य़ांमधील धरणे कोरडी पडली आहेत. पाण्यासाठी लोकांना गावोगावी वणवण फिरावे लागत आहे. चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असून दुष्काळाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. जालना व उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ांत पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक आहे. बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांतील ग्रामीण भाग अक्षरश: होरपळतो आहे. सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सोमवारी येणार असून विभागीय आयुक्तालयात ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. अद्यापी दौऱ्याचा तपशील ठरला नसला तरी माहिती गोळा केली जात आहे.
मराठवाडय़ातील फळबागांना केंद्र सरकारकडून काही मदत मिळू शकते का, हे पवार यांच्या दौऱ्यानंतर स्पष्ट होणार असल्याने कृषी सहायक संचालकांकडून फळबाग नुकसानीचा विस्ताराने आढावा त्यांच्यासमोर ठेवला जाईल. तसेच मराठवाडय़ातील पिकांची परिस्थिती, आवश्यक असणाऱ्या सवलतींची चर्चाही या बैठकीत होण्याची शक्यता आहे. कृषिमंत्री शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येणार आहेत. अद्याप त्यांचा दौरा लिखित स्वरूपात आला नसला तरी १२ फेब्रुवारीला ते येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामीण भागात टँकर रिकामा करण्यासाठी प्लास्टिकच्या टाक्या तातडीने पुरविण्याची गरज असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या टाक्या काही साखर कारखान्यांनी उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी साखर आयुक्तांनी प्रयत्न करावे, असे विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी कळविले आहे. मराठवाडय़ात काही निवडक कारखाने नीटपणे उसाचे गाळप करतात. तसेच काही मोजकेच नफ्यात आहेत. त्यामुळे किती कारखाने प्लास्टिकच्या टाक्यांसाठी मदत करतील, यावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.