News Flash

पवार फेसबुक प्रकरण, पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह

केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या तरुणाला अटक करण्यासंदर्भात नवी मुंबई पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून,

| November 22, 2013 08:15 am

केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या तरुणाला अटक करण्यासंदर्भात नवी मुंबई पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, यासाठी गृहविभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. पालघर प्रकरणात पोलिसांनी परस्पर भूमिका घेतल्याने ती पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली होती. त्यामुळे दुधाने तोंड भाजल्याने ताक पण फुंकून पिण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध करणाऱ्या नेरुळ येथील प्रवीण पिसाळ या तरुणाच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी ही तक्रार केली आहे. मराठा आरक्षणाला पवार यांचा विरोध असल्याचे या छायाचित्राद्वारे भासविण्यात आले होते. पवार यांच्या छायाचित्राबाबत आक्षेपार्ह मजकूर पाटील यांनी पुण्यात पहिला आणि त्यांनी त्याचा तपास त्यांच्या पद्धतीने केला. त्यावेळी हे छायाचित्र अपलोड करणारा तरुण हा नवी मुंबईतील नेरुळ उपनगरातील असल्याचे आढळून आले. हा तरुण एका खासगी कंपनीत कामाला असून त्याने हे छायाचित्र केवळ टाइमपास म्हणून लोड केल्याचे पोलिसांना सांगितले. ( आशाप्रकारची अनेक छायाचित्रे अलीकडे अपलोड होत असून, यातून पंतप्रधानांपासून सरपंचापर्यंत कोणीही सुटलेले नाही) या तरुणाने व त्याच्या आईने पोलिसांची माफीदेखील मागितली, मात्र पाटील यांनी या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह केला. त्यामुळे नेरुळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण या तरुणाला अटक करण्याबाबत पोलीस साशंक आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसिद्ध करणाऱ्या तरुणींना अटक करणाऱ्या पोलिसांना नंतर निलंबित करण्यात आले होते. यात ठाणे ग्रामीण अधीक्षकांनाही हे प्रकरण जड गेले होते. त्यामुळे फेसबुकवरील बदनामीबद्दल करायचे काय, असा प्रश्न नवी मुंबई पोलिसांना पडला असून, त्यासाठी कायद्याची पुस्तके तपासली जात आहेत. त्यामुळे हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार नाही याची काळजी घेताना वरिष्ठांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. वारिष्ठांनी हे प्रकरण गृह विभागाकडे धाडले आहे. अभिप्रायानंतर या तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. हा गुन्हा जामीनपात्र आहे. पवार यांना काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात एका शीख तरुणाने मारहाण केली होती. त्यावेळी त्याला माफ करण्याचे आदेश पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्यामुळे त्यानंतर उद्भवणारा मोठा प्रसंग टळला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:15 am

Web Title: pawar facebook case police in confusion
Next Stories
1 महापालिका किंवा तीन नगरपालिका..!
2 बिल्डरांसाठी वृक्षांवर कुऱ्हाड!
3 जिज्ञासा एकविशीत!
Just Now!
X