केवळ आठ खासदार असलेले शरद पवार पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहतात. मग ११७ खासदार असलेल्या भाजपच्या नरेंद्र मोदींनी स्वप्न पाहिले तर बिघडले कुठे? या वेळी तर पवारांना मंत्रिपदसुद्धा मिळणार नाही, असा टोला लगावून फक्त १५ दिवस राज्याची सत्ता द्या, मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन दाखवतो, असे जाहीर आव्हान खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिले. आपल्याविरुद्ध उभे राहून पडायला कोणीच तयार नसल्याने राष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पाशा पटेल यांच्या पायी िदडीनिमित्त मुंडे यांची येथे जाहीर सभा झाली. सभा सुरू होताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. परंतु पावसातच मुंडेंनी राष्ट्रवादीच्या पवार काका-पुतण्यावर टीका करून झोडपून काढले. पाशा पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर, सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी यांच्यासह जिल्हय़ातील प्रमुख नेते उपस्थित होते. मुंडे म्हणाले, की देशात नरेंद्र मोदींची लाट आली आहे. या लाटेत राष्ट्रवादी पालापाचोळय़ासारखी उडून जाईल. पंतप्रधानपदासाठी मोदींचे गुडघ्याला बािशग या पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुंडे म्हणाले, की केवळ ८ खासदार असलेले पवार पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहतात, तर भाजपचे ११७ खासदार असताना मोदींनी हे स्वप्न पाहिले तर बिघडले कुठे? मात्र, या वेळी पंतप्रधानपद तर सोडाच, पवार यांना मंत्रिपदसुद्धा मिळणार नाही, असा टोलाही लगावला.
मराठा आरक्षणावर मुंडे म्हणाले, की सत्ता तुमची असून आरक्षण मिळत नाही. दोष आम्हाला का देता? १५ दिवसच राज्याची सत्ता द्या, मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन दाखवतो, असे आव्हान त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याविरुद्ध उमेदवार शोधण्यासाठी अनेक बठका घेतल्या, मात्र पराभूत होण्यास एकही नेता तयार नसल्याने अजून उमेदवारच निश्चित होत नाही. अनेकांच्या नावाची केवळ चर्चाच केली जाते. आपले आव्हान आहे राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर करावा. नांदेड, पुणे व नगर या तीन जिल्हय़ांतून आपल्याला निवडणूक लढवण्याचे निमंत्रण आले आहे, मात्र आपण बीडमधूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगून मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बीड क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. इंग्रजांविरुद्ध पहिला लढा धर्माजी मुंडे यांनी लढला. मात्र, आता आमच्यात फितुरी कोठून आली? असा सवाल करीत आमदार धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. जिल्हय़ातील कायदा-सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे. राज्यमंत्र्यांच्या कृपाछत्रानेच गुंडगिरीने थमान घातले आहे. पोलिसावर गोळीबार करणारे आरोपी याच मंत्र्याचे कार्यकत्रे आहेत. १५ दिवसांत कायदा-सुव्यवस्था पूर्वपदावर आली नाही तर आपण स्वत: रस्त्यावर उतरून मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला. पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाबाबत सरकारचे धोरण आपल्या खास शैलीत उपस्थितांना समजून सांगितले. सभेला मोठय़ा संख्येने तरुणवर्ग उपस्थित होता.