‘महावितरण’चा पवित्रा
कृषी वीज पुरवठय़ाचे रोहित्र जळाल्यास अथवा नादुरुस्त झाल्यास ते दुरुस्त करण्यासाठी त्या रोहित्रावरील किमान ८० टक्के वीज देयके ही भरणे अपेक्षित असते. हिवाळ्यात असे रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी १०० टक्के वसुली हा पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. थंडीच्या हंगामात ग्रामीण भागात सदोष रोहित्रांची दुरुस्ती करताना असे अडथळे निर्माण होऊ नये म्हणून थकीत देयके भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. नाशिक परिमंडलात कृषीपंपधारकांची १२१२ कोटीहून अधिकची थकबाकी आहे. थकबाकीचा हा डोंगर कमी करुन परिमंडल भारनियमन मुक्त करण्यासाठी खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुसरीकडे थकबाकीदारांवर वीज जोडणी खंडित करण्याचा बडगा उगारण्यात आला आहे.
नाशिक परिमंडलात ६.३९ लाख कृषीपंपधारकांना ६५७.४५ कोटी रूपयांची चालू देयके वितरित करण्यात आली आहे. परंतु, त्यापैकी केवळ १.६१ लाख कृषीपंपधारकांनी ११५.५६ कोटींचा भरणा केलेला आहे. म्हणजे चालू देयकांची ५४१.८२ कोटींची थकबाकी असून आतापर्यंतच्या थकबाकीचा आकडा १२१२.६४ कोटींवर पोहोचला आहे. नाशिक परिमंडलात २.९८ लाख तर अहमदनगर जिल्ह्यात ३.४१ लाख ग्राहकांकडे ही थकबाकी आहे. एका कृषीपंपाला जोडणी देण्यासाठी महावितरणला सुमारे १.५२ लाख इतका सरासरी खर्च येतो.
हिवाळ्याच्या हंगामात वीज रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असते. परंतु, अशा जळालेल्या रोहित्रांचे पुर्नव्यवस्थापन अर्थात दुरूस्ती करताना वेगळा निकष लावला जाणार आहे. नादुरुस्त रोहित्रावरील किमान ८० टक्के देयके भरणे अपेक्षित आहे. या काळात एखादे रोहित्र जळाले आणि त्यावरील देयकांची उपरोक्त निकषानुसार वसुली नसल्यास त्या रोहित्राकडे दुर्लक्ष केले जाईल, असे महावितरणने अप्रत्यक्षपणे अधोरेखीत केले आहे. किमान थंडीच्या काळात ही भीती दाखवून शक्य ती वसुली करण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. महावितरण महानिर्मिती व खुल्या बाजारातून वीज रोख पैसे मोजून घेते. ही वीज कृषीपंपधारकांना अत्यल्प किंमतीत म्हणजे ८४ पैसे दराने दिली जाते. असे असुनही नाशिक परिमंडलात कृषीपंपधारकांची सर्वाधिक थकबाकी आहे. वीज व वित्तहानीच्या आधारावर सध्या रोहित्रनिहाय भारनियमन सुरू आहे. ज्या रोहित्रावर थकबाकी वाढेल तिथे भारनियमन आणि ग्राहकांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच असे रोहित्र नादुरुस्त झाल्यास त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा केला जाण्याची शक्यता
आहे. ज्या रोहित्रांवर वसुली प्रमाणात आहे आणि गळती प्रमाणात आहे, अशा अ, ब, क, ड गटातील वाहिन्या भारनियमनमुक्त झाल्या आहेत.

वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम
वीज थकबाकीदार कोणीही असला तरी त्याचा मुलाहिजा न बाळगता सरसकट सर्व कृषीपंप थकबाकीदारांची जोडणी खंडित केली जाणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे. नाशिक परिमंडलात १,६१,०२९ ग्राहकांकडे चालु देयकांची ११५.५६ कोटींची देयके थकली आहेत. त्यात नाशिक शहर मंडळात १०,३४४ ग्राहकांकडे ७.४७ कोटी, नाशिक ग्रामीण विभागात सर्वाधिक १७.४७ कोटी, चांदवड विभाग १५.०५, कळवण ८.६६, मालेगाव ३.९०, मनमाड ५.११, सटाणा ६.२६ या प्रकारे नाशिक ग्रामीण मंडळात ५६.४७ कोटीची थकबाकी आहे.