बेस्ट दिनानिमित्त ग्राहकांना भेट
बेस्ट दिनाचे औचित्य साधून येत्या ७ ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या सेवेसाठी मोबाइलवरून वीज बिल भरण्याची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाच नवे बसमार्गही सुरू करण्यात येणार असून आगळ्यावेगळ्या पद्धतीने नव्या बसमार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
बेस्ट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता आणि बेस्ट समिती अध्यक्ष नाना आंबोले यांनी परिवहन विभाग आणि विद्युतपुरवठा विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला.
वीज बिल भरण्यासाठी केंद्रांवर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागतात. अनेक वेळा रांगेत उभे राहूनही वेळ संपल्यामुळे बिल भरता येत नाही. त्यामुळे आता मोबाइलवरून वीज बिल भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित कार्यक्रमात महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात येईल. त्याचबरोबर पाच बस मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. या बसगाडय़ांमधून कलावंत मंडळी रवींद्र नाटय़ मंदिरात दाखल होतील आणि बसमार्गाचे महापौरांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होईल, असे बेस्ट समिती अध्यक्ष नाना आंबोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नव्या निवासी आणि व्यापारी संकुलांसाठी नवीन बसमार्ग, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन बसगाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ, पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या बसच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. समांतर बसमार्गाचे विलीनीकरण करून बेस्ट आणि प्रवाशांना फायदेशीर ठरणाऱ्या ठिकाणी बससेवा प्रवर्तित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.