टोलविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह १४७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना सायंकाळी न्यायालयासमोर उभे केले असता वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.     
शिरोली टोल नाका येथे शनिवारी रात्री आयआरबी कंपनीच्या टोलआकारणीच्या विरोधात कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी टोल नाक्यांच्या मोडतोडीचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. तथापि, आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असतानाही पोलिसांनी अमानुष लाठीमार करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला होता. या लाठीमाराच्या निषेधार्थ आणि संजय कुरुंदकर व वैशाली माने या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन व घंटानाद करण्याचा इरादा या वेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केला होता.     
मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवसैनिक मोठय़ा संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धावले. आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या धरणे आंदोलनात धर्माजी सायनेकर, नगरसेविका स्मिता माळी, दुर्गेश लिंग्रज, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, जयवंत हरुगले, महिला आघाडी अध्यक्ष पूजा भोर, मंगल कुलकर्णी, पूजा कामते यांच्यासह दोनशेवर कार्यकर्त्यांचा समावेश होता. आंदोलकांकडून पोलीस प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या. कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घंटानादही केला. या वेळी आमदार क्षीरसागर टोलविरोधातील आंदोलन पोलीस दडपशाहीच्या माध्यमातून मोडून काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या या कृत्याच्या विरोधात विधानसभेमध्ये हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असून, तेथेच त्यांना उत्तर द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.    
शिवसेनेच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे, सुभाष वोरा, दिलीप देसाई, भाजप शहराध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, विद्या पाटील, सदानंद कोरगावकर, अमर क्षीरसागर आदी सामाजिक कार्यकर्ते आले होते. ते काही काळ आंदोलनात सहभागी झाले होते.     
शहरामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी काल रात्रीच आंदोलन करू नये, अशी नोटीस आमदार क्षीरसागर यांना बजावली होती. त्याचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी धरणे आंदोलन सुरू झाल्यानंतर अध्र्या तासात आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. मात्र त्यास आंदोलकांनी नकार दिला. त्यामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, दीपक कदम, यशवंत केडगे, प्रताप सोमण, सयाजी गवारे यांच्यासह सुमारे २०० पोलिसांनी आंदोलकांचे अटकसत्र सुरू केले. पाच व्हॅनमधून आंदोलकांना अलंकार हॉल येथे नेले. आमदार क्षीरसागर यांच्यासह १४७ जणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.