सोलापूर जिल्ह्य़ातील पाण्याचा प्रश्न पेटला असून उजनी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट उजनी धरणावर जाऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा आंदोलनाचे नेतृत्व करणारे संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरूच होते.
उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून वरच्या धरणातील पाणी सोडावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. जिल्ह्य़ातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांनी हीच मागणी यापूर्वी केली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही मागणी फेटाळून लावताना स्थानिक लोकप्रतिनिधींना चांगलेच फटकारले. त्यामुळे आता पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याची मागणी कोणीही करीत नाही. पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याऐवजी कर्नाटकातील अलमट्टी धरणाचे पाणी मिळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा होत आहे. मात्र अलमट्टी धरणाच्या पाण्याचे गाजर दाखविण्यापेक्षा पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडणे सोयीस्कर असल्याचे मत मांडले जात आहे. राजगुरुनगर परिसरातील भामा-आसाखेड धरणापासून उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र अवघे पन्नास किलो मीटर अंतरावर आहे. या धरणात सध्या आठ ठीएमसी पाणी साठा शिल्लक असून या पाण्याचा वापर होत नाही. त्यामुळे या धरणातील दोन टीएमसी पाणी सोडणे सहज शक्य आहे. यासह एकूणच उजनी धरणाच्या पाण्याचा प्रश्न आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाती घेतला आहे. यापूर्वी ऊस आंदोलन यशस्वी केल्यानंतर आता शेतक ऱ्यांच्या व ग्रामीण जनतेच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रान उठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या संघटनेच्या आंदोलनाला शेतकरी व खेडूत जनतेकडून तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्य़ात टेंभुर्णी व मंगळवेढा येथे शेतक ऱ्यांच्या सभा घेतल्या. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक होऊन शासनावर विशेषत: राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली. शेतक ऱ्यांना पाणी मिळू न देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक नंबरचे शत्रू असून त्यांच्यासमोर लाचार ठरलेले जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी आता बिनकामाचे ठरल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली होती. या दोन्ही सभा शेतक ऱ्यांच्या उपस्थितीने गाजल्या.
या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढचा टप्पा म्हणून आता थेट उजनी धरणाकडे कूच करून पाण्यासाठी धरणावरच ‘धरणे आंदोलन’ सुरू केले आहे. सकाळी अकरा वाजता या आंदोलनात सुमारे तीनशे शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. संजय पाटील-घाटणेकर यांच्यासह संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले, नितीन बागल, शिवाजी पाटील, संमाधान फाटे आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा त्यात प्रामुख्याने सहभाग होता. सायंकाळी अंधार पडल्यानंतर आंदोलक कार्यकर्त्यांची संख्या रोडावली. रात्री सुमारे शंभर कार्यकर्ते धरणे आंदोलन करीत होते. उजनी धरणातून उजल्या व डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडावे या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम असून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही, तोपर्यंत उजनी धरणावरील आंदोलन कायम राहणार आहे, असा इशारा संजय पाटील-घाटणेकर यांनी दिला आहे.