युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी जिल्हय़ातील सहा विधानसभा मतदारसंघात आज उत्साहात मतदान झाले. उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघात उद्या (शुक्रवार) मतदान होणार आहे. नंतर लगेच नगर शहर व राहाता येथे मतमोजणी होणार आहे. कोठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचा दावा नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केला.
युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी जिल्हय़ात काँग्रेसअंतर्गत थोरात व विखे गटात तह झालेला असल्याचे समजले. नगर मतदारसंघ थोरात गटाकडे तर शिर्डी मतदारसंघ विखे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रदेशच्या निवडणुकीसाठी विखे गट थोरात गटास सहकार्य करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत फारशा तक्रारी जिल्हय़ात झाल्या नाहीत.
आज नगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात ७१९ पैकी ४४७, पाथर्डी-शेवगावला २३१ पैकी १७९, कर्जत-जामखेडला ४८६ पैकी ४७२ मतदान झाल्याची माहिती लोकसभा निवडणूक अधिकारी जितेंद्रसिंग यांनी दिली. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ८०० पैकी ७५३, नेवासे २९७ पैकी २५०, कोपरगावमध्ये २२७ पैकी २११ जणांनी मतदान केल्याची माहिती शिर्डी लोकसभा निवडणूक अधिकारी जयप्रकाश नारायणसिंग यांनी दिली.
उद्या, शुक्रवारी नगर लोकसभा मतदारसंघातील नगर शहरासह राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात व शिर्डीतील अकोले, संगमनेर व शिर्डी अशा एकूण ६ विधानसभा मतदारसंघांत मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ अशी आहे. मतदान संपल्यानंतर नगर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतपेटय़ा नगर शहरात आणल्या जातील व बसस्थानकाजवळील जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात मतमोजणी केली जाईल. त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्व मतपेटय़ा राहात्यात सेंट जॉन शाळेत आणून मतमोजणी होईल. रात्री निकाल जाहीर केला जाईल.
पाथर्डीत तक्रार
दोन्ही लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी आज मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले असले तरी पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका उमेदवाराविरुद्ध तक्रार नोंदवली गेली आहे. गुन्हे दाखल नसणारे कार्यकर्तेच निवडणूक लढवू शकतात, मात्र गुन्हे दाखल असलेला एक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. यासंदर्भात निवडणूक अधिकारी जितेंद्रसिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबद्दल माहिती देण्यास नकार देऊन आलेल्या तक्रारी आपण वरिष्ठांकडे पाठवत असल्याचे सांगितले.