पदवीधर मतदारसंघाचा प्रतिनिधी निवडण्यासाठी शुक्रवारी नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्य़ांत शांततेत अंदाजे सरासरी ४० टक्के मतदान झाले. या सहाही जिल्ह्य़ांत मतदानासाठी कुठेही उत्साह दिसला नाही. अतिशय संथ गतीने मतदान सुरू होते. नागपूर शहरात तसेच ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती होती. मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याची चर्चा होती.  
महायुतीचे प्रा. अनिल सोले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ. बबन तायवाडे आणि फुले-शाहू-आंबेडकर मंच व बहुजन समाज पक्ष समर्थित उमेदवार, निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यासह चौदा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी २४ जूनला मतमोजणी होणार असून पदवीधरांचा आमदार कोण, हे त्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
यंदा २ लाख ८७ हजार ११८ मतदार तसेच नागपूर जिल्ह्य़ात १७८, वर्धा जिल्ह्य़ात ३२, भंडारा जिल्ह्य़ात २३, गोंदिया जिल्ह्य़ात २२, चंद्रपूर जिल्ह्य़ात ४४ व गडचिरोली जिल्ह्य़ात १८, असे एकूण ३१७ मतदान केंद्रे होती. त्यावर एकूण १ हजार ४०८ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा आणि कार्यालयीन कामकाजाचा दिवस पाहता अनेक मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाणे पसंत केले. काही ठिकाणी सकाळीच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. एवढा अपवाद वगळता दिवसभर कुठल्याच केंद्रावर गर्दी दिसली नाही. सकाळी दहानंतर अगदीच संथ गतीने मतदान सुरू होते. दिवसभर हाच प्रकार सुरू होता.
पंडित बच्छराज व्यास विद्यालयातील एका मतदान केंद्रावर सकाळी दहा वाजता दहा टक्के, बिंझाणी महाविद्यालयातील एका मतदान केंद्रावर दुपारी बारा वाजता एक हजारपैकी ११० जणांचे, मोहता विज्ञान महाविद्यालयातील एका मतदान केंद्रावर साडेबारा वाजता १९ टक्के, पंडित बच्छराज व्यास विद्यालयातील एका मतदान केंद्रावर दुपारी एक वाजता दीड हजारपैकी केवळ दोनशेजणांचे मतदान झाले होते. नागपूर शहरात तसेच ग्रामीण भागात कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती होती. कामठीत तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात मतदान केंद्रे होती. तेथे सकाळीच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दुपारी संथ गतीने तर सायंकाळी पुन्हा गर्दी झाली.
महापालिका वा इतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकांसारखा मतदारांचा उत्साह कुठेच दिसला नाही. रस्त्याने जाताना मतदारांच्या झुंडी नव्हत्या. मतदान केंद्रांवर विविध उमेदवारांचे बूथ होते. बहुतेक सर्वच ठिकाणच्या बूथवर संगणक होते नि त्यावरून लगेचच मतदारांना मतदार यादीतील अनुक्रमांक शोधून दिले जात होते. असे असले तरी उत्साह ना बूथवर होता ना मतदान केंद्रांवर. मतदान केंद्रांवर गेल्यानंतरही विशिष्ट क्रमांकाची खोली कोणती, असा प्रश्न मतदारांना पडत होता. अशावेळी तेथे तैनात पोलीस त्यांना तेथील मतदार यादीत नाव बघायला सांगत होते. तेथील यादीत नाव दिसले तर या खोलीत मतदान, हे स्पष्ट होते.
दुपारनंतर मतदानाला गर्दी झाली. काही नोकरदार मतदारांनी सकाळीच मतदान करून कार्यालयात जाणे पसंत केले. साप्ताहिक सुटी नसलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्यांच्या प्रशासनिक प्रमुखांनी अशा मतदारांना मतदान करण्यासाठी सकाळी चार तास कामावर उशिरा येण्याची किंवा सायंकाळी कामावरून चार तास लवकर जाण्याची अथवा मधल्या सोईच्या वेळेमध्ये चार तास अनुपस्थित राहण्याची सवलत द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले होते. त्यामुळे अनेक नोकरदार मतदार दुपारीच भोजनाच्या सुटीनंतर कार्यालयातून मतदानासाठी निघून गेले. अनेकांनी मतदान केल्यानंतर कार्यालयात न जाता लगेचच घर गाठले. दुपारनंतर झालेल्या गर्दीत नोकरदार मतदारांची संख्या जास्त होती.
नेत्यांचे मतदान
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व कांचन गडकरी यांनी महालमधील न्यू इंग्लिश हायस्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. खासदार अजय संचेती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी, माजी खासदार विलास मुत्तेमवार व त्यांचे चिरंजीव गितेश यांनी शंकरनगरातील सरस्वती विद्यालय, रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी नागसेन विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केले. निवडणुकीतील उमेदवारांनीही सकाळीच मतदान उरकले. डॉ. बबन तायवाडे व डॉ. शरयू तायवाडे यांनी संताजी विद्यालय, किशोर गजभिये यांनी नागसेन विद्यालय, अनिल सोले यांनी पत्नीसह पितळे शास्त्री हायस्कूलमध्ये मतदान केले. त्यानंतर उमेदवारांनी शहरात विविध मतदान केंद्रांवर जाऊन कार्यकर्त्यांची विचारपूस केली.

अनिल सोले, बबन तायवाडे, किशोर गजभिये हे उमेदवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार अजय संचेती, रोहयो मंत्री नितीन राऊत, आमदार देवेंद्र फडणवीस, माजी खासदार विलास मुत्तेमवार मतदान करताना. (लोकसत्ता छायाचित्र)