13 August 2020

News Flash

तो आला.. त्याला पाहिले.. आणि तो ‘राजा’ झाला

गावागावांत, माळरानावर दिसणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हल्ली दिसेनासा झाला आहे. परंतु तो आपल्या गावात जरी कोणाला दिसला किंवा त्याची कुणकुण जरी लागली तरी त्याला

| September 2, 2015 04:50 am

गावागावांत, माळरानावर दिसणारा आपला राष्ट्रीय पक्षी मोर हल्ली दिसेनासा झाला आहे. परंतु तो आपल्या गावात जरी कोणाला दिसला किंवा त्याची कुणकुण जरी लागली तरी त्याला पाहण्याचा मोह काही आवरत नाही. नर जातीमध्ये सुंदरतेचे वरदान लाभलेला हा मोर सध्या पनवेल तालुक्यातील एका कुटुंबाचा गेले चार वर्षांपासून जणू सखा-सोबती आणि ‘राजा’च बनला आहे.
पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावातील आत्माराम पाटील यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी या मोराशी चांगली गठ्ठी जमली आहे. चार वर्षांपूर्वी जंगलाच्या दिशेने तो गावात शिरला. त्यावेळी तो अगदी लहान होता. लहान पंखांनी मोठी झेप घेणे त्याला कठीण जात होते. तरीही तो गावात कोणाच्या कौलांवर तर कधी झाडांवर जाऊन बसे. गावातील बच्चे कंपनींचा तो चांगला मित्रच झाला होता. तो आल्याची कुणकुण जरी लागली तर बच्चे कंपनी त्याला पाहण्यासाठी घराच्या कौलावर चढत तर कधी झाडांच्या फांद्यात सापडतो का ते पाहण्यासाठी धडपडत. गावात एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. तेथे या मोराचे नेहमी आगमन होत असे. मग तेथे  पहिल्या पावसाच्या चाहूल लागताच तो येथे मुलांसमोर थुईथुई नाच करून दाखवी. त्यामुळे हे मुले खूपच आनंदित होत असत. या मोराने तर त्याच्या नृत्याविष्काराने आणि सौंदर्याने या मुलांवर नव्हे तर समस्थ ग्रामस्थांवर जणू भुरळच घातली आहे. याच विद्यालयाशेजारी आत्माराम पाटील यांचे घर आहे.  याच घरामध्ये या मोराने आपले भोजनाचे आश्रयस्थान शोधले आहे. या घराच्या मालकिणीने याचे नाव राजा ठेवले आहे. चार वर्षांनी या मोराचा मोठा पिसारा फुलू लागला आहे. गावालगत जंगल आहे. त्यामुळे तो रात्री गावातून जंगलात जातो, आणि पुन्हा रोज सकाळी पहाटेनंतर झाडांच्या फांद्यांच्या मार्गावरून तो  पाटील यांच्या खळ्यात येतो. पाटील यांच्या घरातही तो एखाद्या माणसासारखा वावरतो. आणि त्यांनी दिलेले अन्नही भरपेट खातो. अन्नासाठी उशीर झाल्यास तो घरातच वावरतो किंवा घरातील टीव्ही सुरू असल्यास कुटुंबातील व्यक्तींसोबत तो टीव्हीकडे टक लावूनही पाहतो. राजा याचा घरातील वावरामुळे तो घरात असल्यावर घरातील पंखा बंद ठेवला जातो. सुरुवातीला राजाचा पिसारा मोठा नव्हता आज मात्र तो पिसारा पूर्ण वाढला आहे. गावात पाटील यांना मंडपवाले पाटील या ओळखीप्रमाणे मोरवाले पाटील असेही ओळख राजाने मिळवून दिली आहे. सायंकाळ झाल्यानंतर हा राजा पुन्हा रानाच्या दिशेने कुच करतो. रात्री-अपरात्री पावसाचा जोर असल्यास तो मुक्कामासाठी पाटील यांच्या घरात आश्रय घेत असल्याचे पाटील कुटुंबीय सांगतात. पाटील कुटुंबीय व राजा यांचे हे अनोखे नाते पाहिल्यावर पक्षीमित्र या संज्ञेचा बोध होतो. गावात एखादा कार्यक्रम असला की कार्यक्रमासाठी आलेली पाहुणी मंडळी पाटील यांच्या घरी या मोर राजाची भेट घेतल्याशिवाय जात नाहीत. परंतु राजाला जास्त जमाव पसंत नसल्याचे पाटील कुटुंबीय आवर्जून सांगतात. सध्या हा माणसाळलेला मोर पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावाची ओळख बनला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2015 4:50 am

Web Title: pecoke become family member
Next Stories
1 रुग्णालयांची सफाई वादाच्या भोवऱ्यात
2 रानसई धरणातील पाणी आटले..
3 पनवेल-दादर वातानुकूलित बससेवा पुन्हा सुरू
Just Now!
X