अंधेरी पश्चिमेला सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून रस्त्यांची वाताहत झाली आहे. त्यामुळे या भागात प्रायोगिक तत्वावर पादचारी झोन उभारावेत, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
सध्या अंधेरी पश्चिमेला मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे जे. पी. मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
या मार्गाला पर्याय म्हणून एस. व्ही. रोडचे रुंदीकरण करण्यात येणार होते. परंतु आजतागायत रुंदीकरणाचे काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
परिणामी जे. पी. मार्ग आणि एस. व्ही. रोड जंक्शनवरुन कलिंगा ज्वेलर्स गल्लीपर्यंत वाहनांना प्रवेश देऊ नये. ही वाहतूक दाऊदबाग लेनमधून वळवावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अमित साटम यांनी केली आहे. त्यामुळे चालण्यासाठी रस्ता मोकळा होईल आणि पादचाऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
मुंबईमधील उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. अनधिकृत स्टॉल्स आणि झोपडपट्टय़ांचे साम्राज्य वाढू लागले आहे.
ही अतिक्रमणे हटवून तेथे पादचारी झोन उभारावा. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मार्ग मोकळा होईल.
तसेच काही ठिकाणी वाहनतळ उभारून रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या वाहनांची व्यवस्था करावी, असे साटम यांनी सूचित केले आहे.