खारघर येथील सायन-पनवेल महामार्गावर स्पॅगेटी येथे गेल्या पाच वर्षांत ३४ बळी गेल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी पादचारी पुलाचे काम करण्याची भूमिका घेतली आहे. माहितीच्या अधिकाराचा मारा नागरिकांनी सुरु केल्यावर लगेच मे महिन्याच्या अखेर पर्यंत पुलाचे काम पुर्ण होणार असल्याचे पत्र माहितीद्वारे नागरिकांच्या हाती आले.
स्पॅगेटी घरकुल येथील राहणाऱ्या नागरिकांना रोज कामावर जाताना महामार्ग ओलांडावा लागतो. मात्र हा जिवघेणा प्रवास करताना मनाशी सरकारशी दोन हात करण्याची गाठ या नागरिकांनी बांधली. येथील नागरिकांनी खारघर नागरिक समिती स्थापन करुन या समितीच्या माध्यमातून सरकारी लाल फितीच्या ढिम्म कारभाराला जाग आणण्याची मोहीम सुरु केली.  यामुळे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपुर्वी पादचारी पुलाचे बंद केलेले काम पुन्हा सुरु केले आहे.  हा पादचारी पूल वेळीच बांधला असता तर अनेकांचे जिव वाचले असते अशी भूमिका या समितीने घेतली आहे. नागरिकांच्या या मोहीमेत त्यांच्यासोबत अनेक खारघरवासीय जोडले जात असल्याची माहिती या समितीचे पंकज जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.