जिल्हा सहकारी खादी ग्रामोद्योग संघातील साबण विक्रीत वजनावरून वजन काटा विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती संघाचे अध्यक्ष दिनकर शिरसाठ यांनी वार्षिक सभेत दिली.
जिल्हा ग्रामोद्योग संघाची ६२ वी वार्षिक सभा शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गा मंगल कार्यालयात झाली. सभेस १३२२ सभासदांपैकी ४० ते ५० सभासद उपस्थित होते. संघाचे दुकान चांदवडकर पथावर ५५ वर्षांपासून आहे. दुकानाची इमारत एका विकासकाने खरेदी केली आहे. दुकानाची जागा रिकामी करावी अशी अपेक्षा विकासकाने नोटीसव्दारे सूचित केली आहे.
या विषयावर सविस्तर चर्चा होऊन जागा सोडू नये असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. संघाच्या खर्चात वाढ झाल्याबद्दल काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. वजन काटा विभागाचा दंड संबंधित कंपनीच्या बिलातून भरण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत ज्येष्ठ सभासद पां. भा. करंजकर, त्र्य. ग. गायकवाड, वेदप्रकाश तांबट, मधुकर भालेराव यांच्यासह संचालक शंकर बर्वे, पद्माकर पाटील, रमेशचंद्र घुगे, व्यवस्थापक विनय शेलार आदिंनी भाग घेतला.